कोरोना व्हायसरने आपल्याला एक सकारात्मक गोष्ट शिकवली आणि ती म्हणजे मनुष्य म्हणून एकमेकांना सहकार्य करण्याची. त्यामुळेचे सोशल मीडियावर अनेक मदतीचे हात पुढे आलेले पाहायला मिळत आहे. पण, मानवातील निर्घृणता अजूनपूर्णपणे संपलेली नाही. त्याची प्रचिती देणारा प्रसंग केरळ येथील मलाप्पूरम येथे घडला. भुकेने व्याकुळ असलेली गर्भवती हत्ती मानवी वसाहती नजीक आली... तेव्हा स्वतःला बुद्धिजीवी समजणाऱ्या मनुष्य प्रजातीनं त्या आईची निर्घृण हत्या केली.
काहीतरी खायला मिळेल या आशेनं आलेल्या या हत्तीला स्थानिकांनी अननसातून फटाके खायला दिली. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला. त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. पण अखेर आठवडाभराच्या संघर्षानंतर तिने प्राण सोडले.
निलंबूर येथील वन्य अधिकारी मोहन कृष्णन यांनी हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला. हत्तींना पळवण्यासाठी फटाक्यांचा वापर, ही काही नवीन गोष्ट नाही. पण या घटनेनं पुन्हा एकदा आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे का? याचा विचार नक्की करण्यास भाग पाडले आहे.
मोहन कृष्णन यांनी लिहिले की,"अन्नाच्या शोधात ती गावापाशी आली. मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीचा अनुभव येईल असे तिला वाटलेही नव्हते. गर्भवती असल्याने मनुष्य दया दाखवतील असे तिला वाटले. त्यामुळे तिनं त्या लोकांवर आंधळा विश्वास दाखवला आणि ते अननस खाल्ले. तिच्या डोक्यात फक्त पोटातील बाळाचा विचार होता. पण जे घडलं ते दुर्दैवी होतं."
तोंडाला झालेल्या दुखापतीमुळे ती इकडेतिकडे भटकत होती आणि तिला काही खाताही येत नव्हते. पण, तरीही तिनं गावातील एकाही व्यक्तीला त्रास दिला नाही किंवा हल्ला केला नाही. प्रचंड वेदनेसह ती नदीत उभी राहिली. २७ मे रोजी ही घटना घडली. तिला नदीतून बाहेर खेचण्यासाठी दोन हत्तींची मदत घेण्यात आली.