कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नाहीये. एका व्हिरिएंटच्या मागोमाग दुसरा व्हेरिएंट येतोय. सरकार लसीकरण मोहीम राबवतंय. मात्र लोकं सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क याचं योग्यरितीने पालन करत आहेत का हा मोठा प्रश्न आहे. रस्त्यावर जर कुणी पालिका कर्मचाऱ्याने मास्क कुठे आहे विचारला की मास्कची काहीजणांना आठवण होते. दंडाची रक्कम भरल्याशिवाय ही लोकं वठणीवरच येत नाहीत. देशाच्या सर्व भागात मास्क सक्ती आहे पण अनेक ठिकाणी याचे पालन होताना दिसत नाहीत. विशेषत: पर्यटनस्थळी लोक सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क याचा फज्जा उडवताना दिसत आहेत.
शिमला, मनाली, धर्मशाला येथेही लोक बेफिकर होऊन मास्क न लावता फिरताना दिसत आहेत. या माणसांना एक चिमुकला खडसावतोय. तो त्यांना सतत विचारतोय, मास्क कुठेय तुमचा? लोक मात्र ही गोष्ट गांभीर्याने घेताना दिसत नाहीत काही लोक त्या चिमुकल्याच्या डोक्यावरून हात फिरवून निघुन जातायत तर काहीजण त्याच्या विचारण्याकडे सपशेल दुर्लक्ष करतायत. हा चिमुकला मात्र कळकळीने लोकांना विचारतोय की तुमचा मास्क कुठे आहे?