मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस रंगात येऊ लागला आहे. आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले असून अद्याप तीन बाकी आहेत. तीन टप्प्यांसाठी सर्वच पक्षांनी प्रचारासाठी जोर धरला आहे. घोषणा, भाषणे, केलेल्या कामांच्या चित्रफिती, जिंगल्स, पक्षगीत, छायाचित्रे याद्वारे निवडणूक प्रचाराचा पाऊस पडत असतानाच आता 'रॅप' संगीतातूनही एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर एका मुलाच्या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये 'गली बॉय' या चित्रपटातील लोकप्रिय गाण्याच्या चालीवर या मुलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक रॅप गाणे गायले आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'गली बॉय' या चित्रपटातील 'अपना टाईम आयेगा' असे हे लोकप्रिय गाणे आहे.
या गाण्याच्या चालीवर नरेंद्र मोदींवरील रॅप गाणे तयार करण्यात आले आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओचे बोल 'फिरसे मोदी आयेगा, खाया ना खायेगा देश को बचायेगा', असे आहेत. यामध्ये नरेंद्र मोदींनी घेतलेल्या अनेक निर्णयांचे आणि त्यांचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ 29 एप्रिल रोजी ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 105,000 जणांनी पाहिले असून 15,000 जणांनी लाईक केले आहे.
दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.