आजकाल बरेच लोक आपल्या घरात पाळीव प्राणी ठेवतात. मात्र, तो प्राणीच मृत्यूचे कारण बनला तर? तर याहून वाईट काहीही असू शकत नाही. असेच, एका रशियन व्यक्तीला घरात मांजर पाळणे प्रचंड महागात पडले. त्यांनी पाळलेल्या मांजरीनेच त्यांच्यावर हल्ला केला. यामुळे त्यांच्या पायाला खोल जखमा झाल्या. या जखमांमधून सतत रक्तस्त्राव सुरू असल्याने काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला.
डेलीमेलच्या वृत्तानुसार, या व्यक्तीचे नाव दिमित्री उखीन असे आहे. 55 वर्षीय दिमित्री रशियातील लेनिनग्रादमध्ये राहत होते. त्यांना आधीपासूनच मधुमेहाचा त्रास होता. दोनच दिवसांपूर्वी त्यांना त्याची हरवलेली मांजर स्टयोपका (Styopka) रस्त्यात सापडली होती. यावेळी त्यांना प्रचंड आनंद झाला होता. त्यांनीतिला घरी आणले होते. त्याच संध्याकाळी मांजरीने त्याच्या पायावर हल्ला करत जोरदार पंजा मारला. या हल्ल्यामुळे दिमित्रीच्या पायातून रक्तस्त्राव सुरू झाला. मधुमेहामुळे त्यांचा रक्तस्त्राव थांबत नव्हता.
आपली प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच दिमित्री यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. मात्र प्राथमिक उपचार करूनही रक्तस्त्राव थांबत नसल्याने वैद्यकीय आपत्कालीन सेवेला पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिका तिथे पोहोचली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दिमित्रीसोबत असलेल्या शेजाऱ्याने सांगितले की रुग्णवाहिका पोहोचायला खूप वेळ लागला.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय आपत्कालीन सेवेला कॉल आला होता. यात त्या व्यक्तीने सांगितले की त्याच्या शेजारी हारणाऱ्या व्यक्तीच्याच्या पायातून रक्तस्त्राव होत आहे. मांजरीच्या हल्ल्यामुळे झालेल्या जखमा एवढ्या खोल होत्या की त्यांमुळे दिमित्री यांचा मृत्यू झाला. दिमित्री यांची पत्नी नताल्या यांनी सांगितले की, घटना घडली तेव्हा त्या घरी नव्हत्या. मांजरासंदर्भात बोलताना नताल्या म्हणाल्या की, ती खूप प्रेमळ आहे, त्या दिवशी तिने असे कसे केले समजत नाही.
तथापि, फोरेन्सिक टीमने अद्याप मांजरीने केलेल्या हल्ल्यात झालेल्या जखमेनेच दिमित्री यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केलेली नाही.