लोकमत न्यूज नेटवर्कबदायू : उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात उंदराची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. उंदराच्या शेपटीला दगड बांधून उंदीर नाल्यात फेकताना प्राणीप्रेमी विकेंद्र शर्मा यांनी पाहिले होते. या प्रकरणी मनोज कुमार नावाच्या व्यक्तीविरोधात उंदराला निर्घृणपणे मारल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
बदायू नगरचे पोलिस उपअधीक्षक आलोक मिश्रा यांनी सांगितले की, उंदराला नाल्यात बुडवून मारल्याची तक्रार मिळाली होती, त्यावरून आरोपी मनोज कुमारला पोलिस ठाण्यात बोलावून तातडीने कारवाई करण्यात आली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.
आता पुढे काय? तक्रारीनंतर पोलिसांनी उंदराचा मृतदेह बदायूच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवला; परंतु, तेथील कर्मचाऱ्यांनी उपकरणांच्या कमतरतेमुळे पोस्टमॉर्टम करण्यास नकार दिला. यानंतर उंदराचा मृतदेह बरेली येथे पाठवण्यात आला. याचा अहवाल चार ते पाच दिवसांत येईल. अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.