कार, बाईक किंवा घरातील वस्तूंमध्ये साप आणि सापाची पिल्ले सापडल्याचे आपण नेहमीच ऐकतो. एकदा तर फ्रीजमध्ये ठेवलेल्या भाजीमध्ये सापाचे पिल्लू सापडले होते. आताही तसाच प्रकार घडला आहे. कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली आहे. घरातील फ्रिजमध्ये एक मोठा कोब्रा वेटोळे घालून बसला होता. जेव्हा कुटुंबातील लोकांची नजर त्याच्यावर पडली तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.
याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विषारी कोब्रा साप फ्रिजच्या मागील बाजुला वेटोळे घालून असल्याचे दिसत आहे. सापाला पाहून घरातल्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. काही वेळात वनविभागाची टीम साप पकडणाऱ्याला घेऊन तिथे पोहोचली.
कोब्रा फ्रिजच्या कॉम्प्रेसरच्या पाईपला वेटोळे घालून आराम करत होता. एका मोठ्या काठीने कॉम्प्रेसर हलविल्यावर साप बाहेर येऊ लागला. यानंतर सर्पमित्राने या सापाला एका बरणीमध्ये कैद केले. वनविभागाच्या टीमने त्याला जंगलात सोडले.
हिवाळ्यात साप उबदार ठिकाणे शोधतात. यामुळे ते फ्रिज, एसीच्या गरम असलेल्या भागात जाऊन लपतात. थंडीचा प्रभाव टाळण्यासाठी साप या ऋतूत सुमारे तीन महिने सतत झोपत असतात. याला हायबरनेशन असे म्हणतात. शीतनिद्रा किंवा सुप्तावस्था असेही म्हणतात. यामुळे थंडीच्या काळात सर्पगृहे बंद ठेवली जातात.