वाराणसी : ध्येय आणि चिकाटी असेल तर कोणतेच कार्य कठीण नसते असे बोलले जाते. याचाच प्रत्यय देणारी कहाणी वाराणसीतील (Varanasi) किरण सिंगची आहे. वाराणसी शहरापासून ३० किमी अंतरावर असलेल्या बाबतपूर या छोट्याश्या गावात राहणाऱ्या किरण सिंगने (Kiran Singh) आपल्या कार्याची जगाला नोंद घ्यायला भाग पाडले आहे. सहा महिन्यांच्या परिश्रमानंतर किरणने ही किमया साधली आहे. तिने केवळ १९ मिनिटे आणि ४६ सेकंदामध्ये सुई आणि धाग्याच्या मदतीने भारताचा नकाशा तयार केला आहे. वाराणसीच्या या मुलीची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.
किरणच्या या कलेची वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तसेच सर्वात कमी वेळात भारताचा नकाशा बनवण्याचा वर्ल्ड रेकॉर्डचा किताब देखील तिने पटकावला आहे. हे ध्येय गाठण्यासाठी आपण सहा महिने कठोर परिश्रम घेतल्याचे किरणने सांगितले. खेड्याकडे राहणाऱ्या किरणला ही किमया साधताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. खेड्याकडे सतत वीज जात असते अशा परिस्थितीत तिने दिव्यावर याचा सराव केला आणि अखेर यश मिळवले.
गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आपल्या लहानश्या गावातील मुलीने एवढी मोठी किमया साधल्याचा गावकऱ्यांना आनंद आहे. गावकरी किरण आणि तिच्या कुटुंबियांचे अभिनंदन करण्याठी घरी हजेरी लावत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे किरण एक तायक्वांदो ट्रेनर देखील असून ती दररोज तायक्वांदो शिकवण्यासाठी मुलांना तब्बल २० किलोमीटर दूरहून सायकलवर आणते.
अशी मिळाली प्रेरणाकिरणने सांगितले की, तिला वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या पूनम रायकडून याची प्रेरणा मिळाली. ती अनेकवेळा पूनमला पेटिंग करताना पाहायची आणि हे पाहूनच तिने सुई आणि धाग्याच्या साहाय्याने सर्वात कमी वेळात भारताचा नकाशा काढण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. तिच्या या पराक्रमाची नोंद ग्रेटेस्ट वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.