जयदीप दाभोळकर, सीनिअर कंटेंन्ट एक्झिक्युटिव्ह, लोकमत डॉट कॉम
युट्यूब असो किंवा इन्स्टाग्राम, नाहीतर फेसबुक, सध्या याशिवाय अनेकांना राहणं कठीणच झालंय. त्यातच यूट्यूब, फेसबुकचे व्हिडीओ असतील किंवा मग इन्स्टा रील्स यांनी तर नेटकऱ्यांना अक्षरश: वेड लावलंय. छोटीशी दिसणारी; पण आपल्या व्हिडीओंच्या माध्यमातून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी बिनधास्त मुलगी म्हणजेच गौरी पवार सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय.
‘विषय आहे का भावा!’ म्हटलं तर आपसूकच तुमच्या नजरेसमोर गौरीचं नाव येईल. गौरी आणि तिची आजी सध्या सोशल मीडियावर हिट आहेत. कोरोनाच्या काळात पहिल्यांदा जेव्हा लॉकडाऊनची घोषणा झाली, तेव्हा तिनं आपला पहिला व्हिडीओ आपल्या ‘बिंधास्त मुलगी’ या यूट्यूब चॅनलवर टाकला होता. आजीसोबत तिने टाकलेल्या पहिल्या व्हिडीओला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर, पुन्हा टाकलेल्या व्हिडीओलाही उत्तम प्रतिसाद मिळाल्याने, व्हिडीओ टाकणं सुरू ठेवल्याचं तिनं एकदा सांगितलं होतं.
गौरी ही मूळची मुंबईकर. जेव्हा केव्हा कोकणात आजीकडे जाणं होतं, तेव्हाच मी आजीसोबतचे व्हिडीओ टाकत असते, असं तिनं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. चॅनलचं नाव बिंधास्त मुलगीच का? यावरही तिने अगदी दिलखुलासपणे आपलं मत व्यक्त केलं होतं. मी टॉमबॉयसारखी आहे आणि प्रत्येक मुलीनं आपल्या मनासारखं जगावं, करावं, असं वाटत असल्याने, आपल्या चॅनलचं नाव ‘बिंधास्त मुलगी’ ठेवल्याचं ती आवर्जून सांगते. सोशल मीडियावर व्हिडीओ टाकण्यापलीकडे गौरी एक आर्टिस्ट आहे. ती उत्तम स्केच आणि पेंटिंगही करते. तिनं सोफिया कॉलेजमधून आपलं डिप्लोमाचं शिक्षणही पूर्ण केलंय. सध्या तिच्या यूट्यूब फॅमिलीसोबत दाेन लाखांपेक्षा अधिक लोक जोडले गेलेले आहेत. गौरी आपल्या चॅनलच्या नावाप्रमाणेच यापुढेही बिनधास्तपणे लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणेल, अशी अपेक्षा करू या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"