नवी दिल्ली - कोरोना महामारी अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. भारतासह अनेक देशांमध्ये कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर दुसरीकडे अनेकांना नोकरीदेखील गमवावी लागली आहे. याचा फटका कुटुंबीयांनाही सहन करावा लागला. पण काही लोकांनी या परिस्थितीसमोर हार न मानता त्याचा सामना केला. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. नोकरी गेल्यानंतर एका महिलेने उबेर बाईक सुरू केली. हे काम निवडल्याबद्दल तिचं भरभरून कौतुक केलं जात आहे.
सोशल मीडिया साइट Linkedin वर बहुतेक लोक नोकऱ्या शोधत असताना, बरेच लोक स्वतःच स्वतःचा मार्ग निवडतात. अशा लोकांच्या कथा इतरांसाठी प्रेरणादायी असतात. रणबीर भट्टाचार्या नावाच्या लेखकाने अशाच एका महिलेविषयीची प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे. रणबीर यांनी एका महिलेसोबत फोटो टाकला आणि सांगितलं की कोरोनाच्या काळात नोकरी गमावल्यानंतरही तिने हार नाही मानली आणि कुटुंब चालवलं.
रणबीर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं- "आज मी उबेर मोटोद्वारे शहरात जाण्यासाठी बाईक बुक केली, त्यामुळे माझी मौतुशी बसू (Moutushi Basu) नावाच्या महिलेशी भेट झाली. ती 30 वर्षांची आहे. ती कोलकात्यापासून काही अंतरावर असलेल्या बरुईपूरमध्ये राहते. लॉकडाऊनपूर्वी ती Panasonic कंपनीत काम करत होती. पण लाखो भारतीयांप्रमाणे तिलाही कोरोना काळात नोकरी गमवावी लागली. आज पाऊस पडत असतानाही तिने माझ्याकडे एक रुपयाही जादा मागितला नाही. जेव्हा मी तिला विचारलं की, पावसाळ्यात कोलकात्यातील रस्त्यावर दुचाकी चालवण्याचा त्याचा अनुभव कसा होता, तेव्हा तिने सांगितलं की घर चालवण्यासाठी पैसे कमवण्याचा दुसरा कोणताही मार्ग माझ्याकडे नाही. देव तिला आशीर्वाद देवो."
प्रेरणादायी पोस्ट वाचल्यानंतर लोकांनी या महिलेचं केवळ कौतुकच केले नाही तर, या महिलेची सोशल मीडिया युजर्सना ओळख करून देणाऱ्या रणबीरचंही कौतुक केले. आता लोक त्या महिलेला मोठ्या प्रमाणावर मदत करण्यास तयार आहेत. अनेकांनी तिच्यासोबत प्रवासही केल्याचं सांगितलं. तर, अनेक लोक महिलेबद्दल अधिक माहिती विचारत आहेत जेणेकरून तिला मदत व्हावी आणि नोकरी मिळावी. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.