भारतात फिरायला आलेल्या अमेरिकन महिलेला या देशाने आपलेसे केले. अमेरिकेत राहणारी क्रिस्टेन फिशर ही महिला २०१७ मध्ये पतीसोबत भारत दौऱ्यावर आली होती. भारतात असलेली विविधता जाणून घेण्यासाठी तिने संपूर्ण देश फिरला. भारतातील विविध शहरांना हजेरी लावून तिने भटकंती केली. मग तिला भारत देश एवढा आवडला की तिचे मन इथेच रमू लागले. तीन मुलांची आई असलेल्या या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामाध्यमातून तिने अमेरिकेच्या तुलनेत भारतात वास्तव्य करणे अधिक चांगले असल्याचे सांगितले.
व्हिडीओमध्ये क्रिस्टेन म्हणते की, अमेरिकेतील लोक मोठ्या प्रमाणात एकटे राहणे पसंत करतात. तेथील लोक सामाजिकदृष्ट्या एकटे राहतात. तिथल्या समाजात समाज, संस्कृती आणि जीवनाचा अभाव आहे जो भारतात सहज सापडतो. इथे भारतात पैशांपेक्षा जीवन आहे असे मला वाटते. त्यामुळेच या देशाने आकर्षित केले. भारतात जे मिळाले ते अमेरिकेत मिळाले नाही.
अमेरिकन महिलेची 'मन की बात'तसेच मी अमेरिका सोडून भारतात स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला असे अनेकजण विचारतात. पहिली गोष्ट अशी की, लोक बोलतात की भारतात राहू शकत नाही कारण अमेरिकेत खूप साऱ्या सुविधा मिळतात. पण, मी या दोन्ही बाबींना आव्हान देते. मला वाटते की, माझी मुले भारतात राहून यशाकडे वाटचाल करत आहेत. त्यांच्याकडे असे जीवन, अनुभव आणि समाज आहे, जे अमेरिकेत मिळाले नसते, असेही ती सांगते.
संबंधित महिला पुढे म्हणते की, परदेशात राहणारे बहुतांश लोक भारतात येण्यास इच्छुक आहेत. मला वाटते की, पैशांहून जीवन अधिक महत्त्वाचे असते. अमेरिकेत पैसा तर भारतात वैभव अधिक आहे. येथील समाजातील नाती अमेरिकेत नाहीत. भारतात आपल्याला कधीच एकटेपणा भासत नाही. दुसऱ्या देशात राहणाऱ्या अनेक भारतीयांना मी भेटली आहे. ही मंडळी तिथे एकटेपणात जगते. तुम्ही अमेरिकेत राहून चांगले पैसे कमावू शकता... जर पैसा सर्वकाही असेल तर तिकडे जावा. मात्र, पैशांपेक्षा जीवन महत्त्वाचे आहे असे मला वाटते.