ओला इलेक्ट्रिकला सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कंपनीविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच, ओलाच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली आहे. आता ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल सोशल मीडियावरही अडचणीत आले आहेत. अलीकडेच स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि भाविश अग्रवाल यांच्यात जोरदार सोशलवॉर झाले होते. आता कुणाल कामराने पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कुणाल कामराने ओला सर्व्हिस सेंटरमध्ये कथित बाउन्सर तैनात केल्यासंदर्भात ट्विट केले आहे.
आरजे कश्यप नावाच्या युजरच्या पोस्टनंतर कुणाल कामराने ही कमेंट केली आहे. स्थानिक ओला सर्व्हिस सेंटरमध्ये अनेक बाउन्सर पाहिले आहेत, असे पोस्टमध्ये युजरने दावा केला होता. कुणाल कामराला टॅग करताना पोस्टमध्ये असे लिहिलं आहे की, "ओलाने आता प्रत्येक सेवा केंद्रावर सुमारे 5-6 बाउन्सर नियुक्त केले आहेत. मी नुकतेच माझ्या जवळच्या ओला सेवा केंद्राला भेट दिली आणि पाहिले की सर्व बाउन्सर ग्राहकांना, तसेच महिला ग्राहकांसोबत वाद घालत होते. तर आता आपल्याला कंपनीकडून अशा प्रकारची सेवा मिळत आहे."
या एक्स यूजरच्या पोस्टचा हवाला देत कुणाल कामराने म्हटले आहे की, "यासंबंधी कोणताही पत्रकार सत्यता तपासू शकतो का? जर ते खरं असेल, तर हे खरोखरच विचित्र आहे - विक्रीसाठी विक्री करणारी टीम आणि नंतर विक्री केल्यानंतर बाउंसर." दरम्यान, याबाबत ओलाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. याचबरोबर, कुणाल कामराने आणखी एका अमोल चौधरी नावाच्या यूजरच्या पोस्टवर कमेंट केली. या पोस्टमध्ये अमोल चौधरी यांनी मुंबईतील विरार येथील ओला एक्सपिरियन्स सेंटरमधील स्वतःचा अनुभव शेअर केला आहे.
अमोल चौधरी म्हणाला, "हे बघ कुणाल कामरा, माझी ओला सर्व्हिस अपॉइंटमेंट तिकीट 05735050 मुंबईतील ओला एक्सपीरियंस सेंटरमध्ये 20 ऑक्टोबर 2024 साठी शेड्युल आहे. परंतु येथे कोणीही स्कूटर दुरुस्तीसाठी घेऊन जात नाही. जॉब शीट दिली जात नाही. सेंटरमधील बाऊन्सर ग्राहकांना उत्तर देण्यासाठी सज्ज असतात." यासोबतच अमोल चौधरीने ओला सर्व्हिस सेंटरचे काही फोटो आणि व्हिडिओही पोस्ट केले आहेत. यावर कुणाल कामराने यांनी भाविश अग्रवाल यांना टॅग करत उपरोधिकपणे लिहिले, "अरे भाविश, तुम्ही इतके अनोखे भारतीय प्रोडक्ट विकले आहेत की आता तुम्हाला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बाउन्सर्स भाड्याने घ्यावे लागत आहेत."