लॉरेंसविलेच्या ग्विनेट कॉलेजमधील एका महिला प्राध्यापिकेचं सोशल मीडियात चांगलंच कौतुक केलं जात असून त्यांची फोटोही व्हायरल झाला आहे. कारण या महिला प्राध्यापिकेने तिच्या एका महिला विद्यार्थीनीच्या बाळाला तीन तास पाठीवर घेतलं, जेणेकरून त्या महिलेला क्लासमध्ये बसता यावं. याचा फोटो प्राध्यापिकेच्या मुलीने २० सप्टेंबरला सोशल मीडियात पोस्ट केलाय. आतापर्यंत ५७ हजारपेक्षा अधिक लाइक्स मिळाले असून ११ हजारपेक्षा अधिक लोकांनी हा फोटो रिट्विट केलाय. विद्यार्थिनीला मदत व्हावी म्हणजे शिक्षिकेने केलेलं हे काम लोकांच्या मनात घर करून गेलं आहे.
डॉ. रमता सिसोको असं या महिला प्राध्यापिकेचं नाव असून त्या कॉलेजमध्ये बायोलॉजी, एनाटॉमी आणि फिजिओलॉजी शिकवतात. काही दिवसांपूर्वी त्यांची एक विद्यार्थीनी तिच्या बाळासोबत कॉलेजमध्ये आली होती. कारण त्या दिवशी तिच्या बाळासाठी कोणतीही बेबीसीटर उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे ती कॉलेजमध्ये बाळाला सोबत घेऊन आली. यावर प्राध्यापिका सिसोको यांनी सांगितले की, 'ती अभ्यासात फार हुशार आहे आणि मेहनती आहे. तसेच परिक्षाही जवळ होती. त्यामुळे मी तिला नकार देऊ शकले नाही'.
प्राध्यापिका सिसोको यांनी पुढे सांगितले की, 'ती बाळाला क्लासमध्ये घेऊन आली, तोपर्यंत ठीक होतं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की, बाळाला मांडीवर घेऊन तिला लिहिण्यास अडचण येत आहे. अशात माझ्यातील मातृत्व जागं झालं. मी मालीची राहणारी आहे. तिथे आम्ही काम करताना मुलांना सांभाळण्यासाठी त्यांना कापडाच्या मदतीने पाठीवर बांधतो. तसंच मी तिच्या बाळाला पाठीवर बांधून घेतलं'.