लेबनानमध्ये झालेल्या विस्फोटाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. बेरूत शहरात झालेल्या या स्फोटात १०० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेलाय तर जवळपास ४ हजारांपेक्षा जास्त जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट ठेवलेलं होतं. ज्याच्यामुळे हा धमाका झाला. सोशल मीडियात या स्फोटाची दाहकता दाखवणारे अनेक व्हिडीओज आणि फोटोज लोकांनी शेअर केले आहेत. असाच एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय ज्यात एक महिला वेडिंग फोटोशूट करत होती आणि तिच्या मागे अचानक स्फोट झाला.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की महिला फोटोशूट करताना किती आनंदी दिसत आहे. वेगवेगळ्या पोज ती देत आहे. पण पुढील काही सेकंदात जे झालं त्याची तिने कधी कल्पनाही केली नसेल. फोटो काढताना काही सेकंदातच धमाका झाला चारही बाजूने फक्त धूरच धूर होता. धमाका झाल्यावर इतक्या वेगाने हवा आली की, आजूबाजूचं सगळं उडालं. सुदैवाने या लोकांना काही झालं नाही.
या व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेचं नाव आहे Israa Seblani. तिचं वय आहे २९. ती यूएसमध्ये डॉक्टर आहे. तिने या धमाक्याबाबत सांगितले की, 'माझ्याकडे जे झालं त्याबाबत सांगण्यासाठी शब्द नाहीत. मी हादरले होते. मला एका क्षणाला असं वाटलं होतं की, मी मरणार आहे. मी अशी मरणार आहे'. या व्हिडीओ बघता येतं की, या महिलेच्या मागच्या हॉटेलच्या काचाही फुटल्या होत्या. लोक इकडे-तिकडे पळत होते. सुदैवाने या महिलेच्या परिवारातील कुणाला काही झाले नाही.