जंगलातील प्रत्येक प्राण्याकडे सुपरपॉवर असते. जसं कुणी उड्या मारण्यात तरबेज असतं तर कुणी वेगवान धावू शकतं. निसर्गाने धोका टाळण्यासाठी किंवा आपला जीव वाचवण्यासाठी सर्वांना स्पेशल हत्यार दिलं आहे. जसा हा छोटासा साळिंदर बघा ना. त्याने आपल्या टोकदार आणि लांब काट्यांच्या मदतीने एका बिबट्याला धडा शिकवला. हा अद्भूत नजारा कुणीतरी कॅमेरात कैद केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ ट्विटर यूजर @darksidenatures ने १२ जुलैला शेअर केला होता. आतापर्यंत या व्हिडीओला ३ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि ६०० पेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. हा व्हिडीओ तसा २०१२ मधील आहे. मात्र, पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या ४५ सेकंदाच्या व्हिडीओत बघू शकता की, एक बिबट्या शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, साळिंदर लवकरच बिबट्याला हे दाखवून देतो की, त्याची शिकार करणं इतकंही सोपं नाही. जसा बिबट्या साळिंदरवर हल्ला करतो तो त्याच्या शरीरावरील टोकदार काटे उभे करतो. ज्यामुळे बिबट्या साळिंदराला टचही करू शकत नाही. बिबट्या प्रयत्न खूप करतो पण तोंडावर काटे रूतल्याने तो गपचूप तेथून निघून जातो.