पानीपत: हरयाणाच्या पानीपतमध्ये एका बिबट्यानं पोलीस आणि वन विभागाच्या पथकावर हल्ला केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचं पथक आणि पोलीस पोहोचल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर बिबट्या अनेकांवर हल्ले करत सुटतो.
वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस काठ्यांच्या मदतीनं बिबट्याला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करतात. मात्र बिबट्या नियंत्रणात येत नाही. बऱ्याच तासांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश येतं. पानीपतचे एसएसपी शशांक कुमार सावन यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. 'वन विभाग आणि पोलीस पथकासाठी कठिण दिवस. यात काही जण जखमी झाले. त्यांच्या धैर्याला सलाम. शेवटी सगळे जण सुरक्षित परतले. बिबट्यादेखील,' असं सावन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'पोलिसांचं काम किती जोखमीचं असतं ते या व्हिडीओमधून स्पष्ट होतं. अनेकदा यापेक्षा मोठी संकटं आ वासून उभी असतात आणि तुम्ही त्यांना पाठ दाखवू शकत नाही. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक पोलीस (जवळपास ३४ हजार) आपण गमावले आहेत. पोलिसांना जो सन्मान मिळायला हवा, तो त्यांना कधी मिळणार?,' असा सवाल आयपीएस अधिकारी सूरज सिंह परिहार यांनी विचारला.