बिबट्याचे नाव ऐकताच लोकांना घाम फुटतो. कारण, अतिशय चपळ असणाऱ्या बिबट्याच्या तावडीत जे फसलं, त्याचं सुटणं मुश्कील असतं. पण जेव्हा बिबट्या माणसाने बनवलेल्या कुठल्या गोष्टीत फसतो, त्याची अवस्था अतिशय वाईट होते. असाच प्रकारचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, महाराष्ट्राच्या कुठल्या भागातील हा व्हिडीओ आहे, हे कळू शकलेलं नाही, मात्र या व्हिडीओमध्ये बिबट्या खोल विहीरीत पडल्याचं दिसतं आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक बिबट्या विहिरीत पडलेला असून तो सतत हातपाय मारत आहे. बिबट्या विहिरीतून बाहेर पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे, पण तो बाहेर पडू शकत नाही. ही घटना स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केली. त्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली.
यादरम्यान लोक बिबट्याचे व्हिडिओ बनवू लागतात. विहिरीभोवती लोकांची गर्दी होते. दरम्यान, 10 फूट खोल विहिरीत पडल्यानंतर बिबट्या चांगलाच घाबरला. विहिरीभोवतीच्या लोकांना पाहून तो डरकाळ्या फोडू लागला. दरम्यान, ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्याची डरकाळी ऐकून त्यांनाही घाम फुटला.
ग्रामस्थांना स्वतःहून बिबट्याला बाहेर काढण्यात अपयश आल्याने त्यांनी याची माहिती वन्यप्राण्यांवर काम करणाऱ्या Wildlife SOS आणि वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर संस्थेने वनविभागाच्या सहकार्याने बिबट्याची सुटका सुरू केली. यावेळी बचाव पथकाकडे पाहून बिबट्या मोठ्या रागाने गर्जना करत होता. हा बिबट्या विहिरीतील एका कपड्याच्या मदतीने तरंगत राहिला.
बऱ्याच प्रयत्नानंतर Wildlife SOS व वनविभागाच्या पथकाने बिबट्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत मोठा पिंजरा लावला. ज्यामध्ये बऱ्याच प्रयत्नानंतर बिबट्या अखेर शिरला. त्यानंतर त्याला बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.