आईसाठी तिचं बाळ म्हणजे जीव की प्राण! मुलाला काहीही झालं, तरी सगळ्यात आधी आईचा जीव तुटतो. त्याला कोणी हानी पोहोचवली तर अद्दल घडवण्यासाठीसुद्धा आई सगळ्यात पुढे असते. हा निसर्गाचा नियमच आहे! त्यातही जर कुणी आपल्याच मुलाच्या जिवावर उठलं, तर मुलाची आई शांत थोडीच बसणार? ती पेटून उठणारच! मुलाच्या अंगावर आलेल्यांना शिंगावर कसं घ्यायचं, हे कोणत्याच आईला शिकवावं लागत नाही. ते प्रकृतीनं (Nature) प्रत्येक आईला शिकवूनच या निसर्गात आणलेलं असतं, हे अधोरेखित करणारी एक घटना समोर आली आहे.
अवघ्या २८ सेकंदाची ही घटना आहे. पण अंगावर काटा आणेल, असा थराराक प्रकार यावेळी घडला. हा सगळा थरार कॅमेऱ्यातही कैद झालाय. रानडुकराच्या पिल्लावर बिबट्यानं जोरदार हल्ला चढवला. रानडुकराचं पिल्लू बिबट्याच्या हल्ल्यानं बिथरलं. जिवाच्या आकांतानं पळू लागलं. पण सुपरफास्ट बिबट्यासमोर रानडुकराच्या पिल्लाचा वेग हा तोकडा पडणार, हे तर स्पष्ट होतं. झालंही तसंच! आपल्याला चांगली शिकार मिळाली, याच्या आनंदात असलेल्या बिबट्यानं रानडुकराच्या पिल्लाला सहज धावत-धावतच तोंडात शिकारीसाठी उचललही होतं. पण आपल्याला शिकार मिळाली, याचा आनंद फार वेळ काही बिबट्याला साजरा करता आला नाही.
काही कळायच्या आतच. अचानक बिबट्यानं रानडुकराच्या पिल्लाला तोंडातून सोडलं आणि बिबट्या जिवाच्या आकांतानं पळू लागला! कारण आपल्या मुलावर झालेल्या जीवघेण्या हल्लातून त्याला वाचवण्यासाठी पिल्लू रानडुकराची आई बिबट्याच्या दिशेनं झेपावली होती. अत्यंत आक्रमकपणे रानडुकराची आई आपल्या दिशेनं पळत येतेय, हे पाहून बिबट्याही बिथरला. रानडुकराच्या पिल्लाची शिकार क्षणात त्यानं सोडून दिली आणि जीव वाचवण्यासाठी तो धडपडू लागला. अखेर बिबट्यानं शिकार सोडली आणि मैदानातून पळ काढला.
wild_animals_of_theworld नावाच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटरुन या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या २८ सेकंदांचा हा थरार आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलाय. जंगलात फिरायला आलेल्या एका पर्यटकानं हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केलाय.