वाघ, सिंह, बिबट्या अशा प्राण्यांना पाहण्याची उत्सुकता असते. त्यासाठी आपण जंगल सफारी, नॅशनल पार्क किंवा प्राणीसंग्रहायलात जातो. पण तिथं जेव्हा हे प्राणी समोर येतात तेव्हा सर्वांची हवा टाईट होते. अंगाला दरदरून घाम फुटतो आणि तोंडातून शब्दही फुटत नाही. समोर असले तरी या प्राण्यांच्या जवळ जाण्याची हिंमत कुणीच करत नाही. साहजिकच ते हिंस्र प्राणी आहेत, काही क्षणात आपली शिकार करती याची कल्पना आपणा सर्वांना आहे. पण एका व्यक्तीने मात्र अशाच प्राण्याच्या जवळ जाण्याची हिंमत केली (Leopard rescue from tree video).
एरवी कुत्रा, मांजर असे प्राणी संकटात असतील तर आपण त्यांच्या मदतीला जातो. पण एखादा हिंस्र प्राणी संकटात असेल तर त्याला मदत करण्याची कितीही इच्छा असली तरी हिंमत मात्र होणार नाही. असं असलं तरी सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे काही जंगली प्राणी पाण्याच्या शोधात वगैरे मानवी वस्तीत येतात. काही वेळा ते एखाद्या विहिरीत पडतात. अशा विहिरीतून बिबट्याला रेस्क्यू केल्याचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण बिबट्याचं असं रेस्क्यू तुम्ही आतापर्यंत कधीच पाहिलं नसेल.
आसाममध्ये एका बिबट्याला रेस्क्यू केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक बिबट्या झाडाला लटकलेला आहे. खाली काही लोक जाळं पसरून त्याला पकडण्यासाठी उभे आहेत. त्या बिबट्याला झाडावरून खाली उतरवण्यासाठी वनविभागाचा एक कर्मचारी स्वतःच त्या झाडावरही चढला आहे. आता बिबट्याच्या इतक्या जवळ जाण्याची हिंमत कुणाचीच होणार नाही आणि बिबट्याही काही तसा शांत बसणारा नाही. पण या बिबट्याला आधीच बेशुद्ध करण्यात आलं आहे. जेणेकरून तो कुणाला हानी पोहोचवणार नाही आणि त्याला पकडून सुरक्षितपणे जंगलातही सोडता येईल.
दुसऱ्या व्हिडीओत झाडावर चढलेल्या कर्मचाऱ्याने झाडाला लटकलेल्या या बिबट्याला झाडातून सोडवून खाली असलेल्या जाळीत टाकलं. खालील लोकांनी त्याला जाळीत गुंडाळल्याचं दिसतं. त्यानंतर त्याला उपचारासाठी प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
आसाम वनविभागाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार गुवाहाटीच्या पांडु लोको कॉलनीतील हे दृश्य आहे.