एकीचं बळ ही गोष्ट तुम्ही लहानपणी ऐकली असेल. एक-एक काठी मोडता येते. पण त्याच काठ्या एकत्र करून त्यांची मोळी बांधल्यावर ती मोडणं अवघड असतं. त्यामुळेच एकजूट असण्यातच मोठी शक्ती असल्याचं म्हणतात. यामुळेच मैत्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जंगलातील मैत्री दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मैत्रीची ताकद काय असते आणि मैत्री कशी निभवायची असते, याचा प्रत्यय या व्हिडीओमधून आला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये आठ सिंह एका म्हैशीवर हल्ला करताना दिसत आहेत. एकटी म्हैस सिंहांना शक्य तितकी टक्कर देत आहे. पुढच्या काही मिनिटांत सिंह म्हैशीचा फडशा पाडणार असं चित्र व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र तितक्याच म्हैशीच्या मदतीसाठी तिचा कळप तिथे दाखल होतो. एक म्हैस तर थेट सिंहांवर चाल करून जाते. एकाला सिंहाला तर थेट शिंगांवर घेते. त्यानंतर आणखी म्हैशी येतात आणि सिंहांना तिथून पळ काढावा लागतो.
भारतीय वन अधिकारी सुधा रमेन यांनी २७ सप्टेंबरला हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. 'कायत तुमच्या सोबत असणारे मित्र तुमच्याकडे तर स्वत:ला श्रीमंत समजा. जंगलातील दुनियेतून एक शिकवण,' असं रमेन यांनी व्हिडीओ ट्विट करताना म्हटलं आहे. आतापर्यंत ६ हजार जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून त्याला आठशेहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.