कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे लोक आपापल्या घरी सुरक्षित असले तरी अनेकांचे हाल होत आहेत. हातावर पोट असलेल्या लोकांना आपलं घर चालवण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे. तर काहींना खायला अन्न सुद्धा नाही. अशा परिस्थितीत मुक्या जनावरांचे खूप हाल होत आहेत. गरमीच्या वातावरणात खायला प्यायला काहीही मिळत नसल्यामुळे रस्त्यावरील मुके जीव भूकेने व्याकूळ झाले आहेत. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा प्रदेशातील आग्रा शहरातला हा व्हिडिओ आहे. यामध्ये रस्त्यावर सांडलेलं दूध एक माणूस आणि भटकी कुत्री एकाचवेळी पीत असताना दिसत आहे. आग्रा शहरातल्या रामबाग चौकातला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका दूधवाल्याचे कॅन रस्त्यावर पडले आणि त्यातलं दूध सांडलं. त्यानंतर माणूस आणि रस्त्यावर भटकणारी कुत्री ते दूध प्यायला लागले.
डोळ्यात पाणी आणणारा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओत लॉकडाऊनमुळे उपाशी असलेला माणूस दुध ओंजळीत घेतो आणि त्याच्याजवळ असलेल्या भांड्यात टाकतो. तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावरचं तेच दूध कुत्रे चाटत आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे काही ठिकाणी प्राण्यांनाच नाही तर माणसांनी खायला अन्न नाही अशी परिस्थितीती निर्माण झाली आहे.