सोशल मीडियावर अनेक प्रेरणादायी घटनांचे व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. हा फोटो पाहून तुम्हाला एका मजूराच्या हिंमत आणि जिद्दीची कल्पना येईल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बाप लेकाचा फोटो मध्य प्रदेशातील धार येथिल आहे. मुलाला दहावीच्या बोर्डाची परिक्षा देता यावी यासाठी वडिलांनी १०५ किलोमीटरचं अंतर सायकलनं पार केलं आहे. तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता तीन दिवसांच्या खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन हा मुलगा वडिलांच्या मागे बसला आहे.
रिपोर्टनुसार मध्यप्रदेशच्या शिक्षण बोर्डाकडून १० वी आणि १२ वीच्या परिक्षेत अयशस्वी ठरलेल्या मुलांना पुन्हा परिक्षा देण्यासाठी संधी दिली जात आहे. त्यामुळेच पहिल्यांदा १० वी नापास झालेल्या बयडीपुरच्या आशिषला १० वीच्या तीन विषयांची परिक्षा द्यायची होती. आशिषच्या मजूर असलेल्या वडिलांचे नाव शोभाराम आहे. मंगळवारी गणिताचा पेपर असल्यामुळे आशिषच्या वडिलांनी लांबचे अंतर पार करून आपल्या मुलाला परिक्षा केंद्रापर्यंत पोहोचवलं. लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीच्या साधनांची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावं लागलं आहे.
आशिषचे घर परिक्षाकेंद्रापासून १०५ किमी लांब होते. कोरोनाकाळात बसेसही बंद असल्यामुळे त्याच्या वडिलांनी सायकलने परिक्षेसाठी पोहोचवण्याचे ठरवले. सोमवारी रात्री १२ वाजता शोभाराम आपल्या मुलासह धार येथून रवाना झाले. तब्बल ७ तास सायकल चालवून यांनी हे अंतर पार केलं. त्यानंतर मंगळवारी सकाळी ८ वाजता पेपरची वेळ सुरू होणार होती. परिक्षा सुरू होण्याच्या १५ मिनिटं आधी हे दोघे परिक्षाकेंद्रावर पोहोचले.
बुधवारी विज्ञान आणि गुरूवारी इंग्रजीचा पेपर असल्यामुळे परिक्षाकेंद्राच्या आजुबाजुच्या गावात ते वास्तव्यास राहिले आहेत. शोभाराम यांनी सांगितले की, ''मजूरीमुळे मी जास्त लिहू वाचू शकलो नाही. पण मला माझ्या मुलाला शिकवून खूप मोठं बनवायचं आहे. आमची आर्थीक स्थिती फारशी बरी नाही. तरीसुद्धा माझ्या मुलानं शिक्षणं घेऊन पुढे जावं असं वाटतं.'' गावातील कोणाकडून तरी ५०० रुपये उधार घेऊन त्यांनी ३ दिवसांचे खाण्यापिण्याचे सामान सोबत घेतले आहे. सोशल मीडियावर सध्या या बाप लेकाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.
हे पण वाचा-
सॅल्यूट! अनवाणी पायांनी कर्तव्य करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला पाहून तुम्हीही ठोकाल सलाम
सनकी हुकूमशहाचा आणखी एक फतवा; पाळीव कुत्र्यांना मारुन खाण्याचे आदेश
याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान