भोपाळ: मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यात लेकराला वाचवण्यासाठी एक महिला थेट बिबट्याला भिडली. सहा वर्षांच्या मुलाची सुटका करण्यासाठी महिलेनं बिबट्याशी दोन हात केले. जवळपास १ किलोमीटर तिनं बिबट्याचा पाठलाग केला. बिबट्याकडून लेकराची सुटका करताना महिला जखमी झालं. तिच्या मुलालादेखील इजा झाली. मात्र महिलेनं बिबट्याशी यशस्वी झुंज दिली. सध्या माय लेकरांवर कुसुमी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिधी जिल्ह्यातल्या कुसुमी ब्लॉकमध्ये असलेल्या टायगर बफर झोनमध्ये येणाऱ्या टमसार रेंजमध्ये बाडीझरिया गाव आहे. गावाच्या आसपास घनदाट जंगल आहे. चोहोबाजूंना डोंगर आहेत. २८ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजता किरण बैगा नावाच्या महिलेनं शेकोटी पेटवली होती. शेजारीच तिचा लहान मुलगा राहुल होता. तितक्यात तिथे एक बिबट्या आला आणि राहुलला जंगलात घेऊन गेला.
राहुलला बिबट्या घेऊन जात असताना किरणनं पाहिलं. तिनं बिबट्याच्या मागे धाव घेतली. जवळपास १ किलोमीटरपर्यंत तिनं बिबट्याचा पाठलाग केला. बिबट्यानं पंजांनी राहुलला घट्ट धरल्याचं पाहताच किरणनं रौद्ररुप धारण केलं. हातातील काठी घेत ती पुढे सरसावली आणि बिबट्यावर तुटून पडली. तिनं कशीबशी बिबट्याच्या तावडीतून राहुलची सुटका केली.
यादरम्यान बिबट्यानंदेखील किरणवर हल्ला केला. त्यात ती जखमी झाली. तिनं मदतीसाठी आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून गावातील काही लोक मदतीला धावले. त्यांना पाहून बिबट्या जंगलात पळाला. मुलाची सुखरुप सुटका केल्यानंतर किरण बेशुद्ध पडली. बिबट्याच्या हल्ल्यात तिला इजा झाली आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.