रक्षाबंधनच्या दिवशी बांगड्या विकणाऱ्या एका मुस्लीम विक्रेत्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. इंदुरच्या बाणगंगा ठाणे क्षेत्रात गोविंद नगर येथील परिसरातील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात असून यात बांगडी विक्रेत्याला काही लोक जबर मारहाण करत असल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. त्यासोबतच त्याच्या बॅगमधून बांगड्या काढून घेण्यात येत असल्याचंही दिसून येत आहे. स्थानिकांनी या बांगडी विक्रेत्याला मारहाण नेमकी का केली यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेत गुन्ह्याची नोंद केली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत तीन युवक या बांगडी विक्रेत्याला जबर मारहाण करताना दिसत आहेत. त्यातील एक जण बांगडी विक्रेत्याच्या बॅगमधून सर्व बांगड्या बाहेर काढून टाकत आहे. तर बांगडी विक्रेता हात जोडून वारंवार माफी मागताना दिसत आहे. मारहाण करणारे युवक या परिसरात पुन्हा दिसायचं नाही अशी धमकी बांगडी विक्रेत्याला देत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे.
पोलिसांनी केली गुन्ह्याची नोंदसोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाणगंगा पोलीस ठाण्याचे अधिक्षक राजेंद्र सोनी यांनी याची दखल घेतली. व्हायरल झालेला व्हिडिओ बाणगंगा क्षेत्रातील गोविंद नगर परिसरातील असल्याचं सांगितलं जात आहे. पण या व्हिडिओ संदर्भात अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असंही राजेंद्र सोनी म्हणाले.