टीबीच्या रुग्णाला आणा मिळवा सोन्याच्या नाण्यांसह रोख बक्षीस, रूग्णालयाची अनोखी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 04:45 PM2022-10-19T16:45:46+5:302022-10-19T16:47:15+5:30
दिवाळीचा सण अगदी काही दिवसांतच येणार आहे, त्यामुळे सर्वत्र ऑफर्स पाहायला मिळत आहेत.
नवी दिल्ली : दिवाळीचा सण अगदी काही दिवसांतच येणार आहे, त्यामुळे सर्वत्र ऑफर्स पाहायला मिळत आहेत. ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी बाजारपेठेतील सर्व दुकानांमध्ये एकापेक्षा एक ऑफर्स आणण्यात आल्या आहेत. काही दुकानदारांनी किंमतींमध्ये मोठी सवलत दिली आहे तर काहींनी एका वस्तूवर दुसरी वस्तू विनामूल्य देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. दिवाळीच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. त्यामुळे छोट्या दुकानांपासून ते मोठ्या शोरूमपर्यंत सगळीकडे धमाकेदार ऑफर्सचे पोस्टर्स लागलेले असतात. मात्र सध्या एका अनोख्या ऑफरची खूप चर्चा रंगली आहे. या ऑफरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी याचे कौतुक करत आहेत.
सोशल मीडियावर रूग्णालयाने दिवाळी ऑफर दिल्याचा फोटो व्हायरल होत आहे. या रूग्णालयाने दिलेली दिवाळी ऑफर अनोखी असल्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधत आहे. टीबी अर्थात क्षयरोगाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठी रुग्णालयाने ही दिवाळी ऑफर दिली आहे. ऑफरच्या पोस्टरवर लिहिले आहे, 'टीबीचा नवीन रूग्ण घेऊन या आणि बक्षीस मिळवा' ही दिवाळी बक्षीस योजना 'राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम' अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. या दिवाळी ऑफरमध्ये 500 ते 50,000 रुपयांपर्यंतच्या बक्षिसांचा समावेश आहे. खरं तर ही ऑफर 24 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर दरम्यान लागू असणार आहे.
टीबी रोग से निपटने के लिए आगर मालवा में स्वास्थ्य विभाग ने अब इनामी योजना चलाई है .... 500 से लेकर 50000 रुपए तक की इनामी राशि #tuberculosis@CollectorAgar@brajeshabpnews@Anurag_Dwary@ManojSharmaBpl@Sandeep_1Singh_@Gurjarrrrr@healthminmp@akankshasxn@yogitalpic.twitter.com/psOW3IBmkZ
— jaffer multani (@jaffer_multani) October 18, 2022
रूग्णालयाच्या ऑफरने वेधले लक्ष
मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यात आरोग्य विभागाने टीबी रुग्णांना जागरूक करण्यासाठी आणि क्षयरोगाचा सामना करण्यासाठी ही योजना चालवली आहे. या योजनेच्या माध्यमातून रूग्णांच्या संख्येच्या आधारे लोकांना बक्षीस दिले जात आहे. जर एका व्यक्तीने एका रुग्णाला आणले तर त्याला 500 रुपये किंवा टिफिन, 5 रुग्णांसाठी 2,500 रुपये किंवा मिक्सर, 10 रुग्णांसाठी 5,000 रुपये किंवा मोबाईल फोन, त्याचप्रमाणे 100 रुग्ण आणणाऱ्या व्यक्तीला 50,000 रुपयांपर्यंतचे बक्षीस दिले जाणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"