सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करण्यासाठी जीव धोक्यात घालणं एका तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. साथीदार व्हिडीओ चित्रित करत असताना तरुणाला रेल्वेनं जोरदार धडक दिली. त्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार तरुणाच्या मित्राच्या व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाला. मध्य प्रदेशातील हौशंगाबादमध्ये हा प्रकार घडला.
पथरौटा पोलीस ठाण्याचे प्रभारी नागेश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजू आणि त्याचा एक अल्पवयीन मित्र बैतूल रोड परिसरात रविवारी संध्याकाळी गेले होते. संजू रेल्वे रुळाच्या शेजारी उभा राहिला. त्याचवेळी त्याच्या मागून भरधाव वेगानं रेल्वे आली. रेल्वे आपल्यापासून काही अंतरावरून जाईल असा संजूचा अंदाज होता. त्यानं हा थरारक व्हिडीओ चित्रित करण्याचं काम त्याच्या मित्राला दिलं होतं.
भरधाव रेल्वे संजूच्या दिशेनं आली. संजूचा अंदाज पूर्णपणे चुकला. रेल्वेनं संजूला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की संजू दूर जाऊन पडला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला इटारसीमधील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. थरारक व्हिडीओ करून सोशल मीडियावर व्हायरल होण्याची स्पर्धा तरुणांमध्ये सुरू आहे. कमी वेळात प्रसिद्ध होण्याचा अट्टाहास अनेकांच्या जीवावर बेतताना दिसत आहे.