Dausa Rajasthan: सोशल मीडियावर नेहमीच अजब गोष्टी व्हायरल होत असतात. इथे कधी काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. अशातच एक पत्र व्हायरल झालं असून ज्यात एका व्यक्तीने त्याच्यासाठी पत्नीची मागणी केली आहे. या व्यक्तीने हे पत्र दुसरीकडे कुठं नाही तर सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या कॅम्पमध्ये सादर केलं. त्याचं हे पत्र वाचताच अधिकारीही हैराण झाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील आहे. सांगण्यात आलं की, राजस्थान सरकार सध्या महागाईपासून दिलासा मिळावा म्हणून काही कॅम्प चालवत आहे. लोकांना इथून मदत केली जाते. याच कॅम्पमध्ये ही घटना समोर आली आहे. झालं असं की, तीन जूनला दौसा इथे राहणारा कल्लू महावरने कॅम्पमध्ये एक अर्ज सादर केला. जेव्हा त्याचा अर्ज वाचला गेला तेव्हा अधिकारीही हैराण झाले.
आता त्याचा हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात त्याने एक पत्नी मिळवून देण्यासंबंधी लिहिलं आहे. त्याने लिहिलं की, माझी घरची परिस्थिती नाजूक आहे. मी घरात एकटाच असतो. घरातील काम करणं त्याच्यासाठी अवघड आहे. त्यामुळे घरातील कामे करण्यासाठी आणि त्याची मदत करण्यासाठी त्याला एका पत्नीची गरज आहे.
त्याने अर्जात पुढे लिहिलं की, अधिकारी साहेब माझी विनंती आहे की, मला पत्नी मिळवून द्यावी. इतकंच नाही तर त्याने या अर्जात पत्नीमध्ये कोणते गुण असावे हेही लिहिलं आहे. त्याने लिहिलं की, पत्नी गोरी हवी, 30 ते 40 दरम्यान तिचं वय असावं, तिला सगळी कामे करता यावीत. तहसीलदारांनी हा अर्ज पुढे सादर करत पटवाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.