लग्नाच्या दिवशी नवरीची पाठवणी करताना वातावरण असं तयार होतं की, सगळ्यांच्याच डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. तुम्हीही अनेकदा असं वातावरण पाहिलं असेल किंवा अनुभवलं असले. अनेकांना असं वाटतं की, केवळ आपल्याच देशात वेगवेगळ्या परंपरा आहेत. पण असं नाहीये. भारताबाहेर तर आणखीन विचित्र परंपरा आहे. रशियातील चेचन्यामध्ये नवरीच्या पाठवणीचा एक असा किस्सा समोर आलाय, जो वाचून तुम्ही हैराण व्हाल. इथे एका भावाला बहिणीच्या पाठवणीवेळी रडणं महागात पडलं आहे. यासाठी त्याला जाहीरपणे माफी मागावी लागली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात बहिणीच्या पाठवणीवेळी भावाचा रडण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून इथे चांगलाच वाद झाला. धार्मिक नेते रमजान कदीरोव यांच्यानुसार, लग्नात रडून मुलाने चेचन्याच्या परंपरांचं उल्लंघन केलं होतं. परंपरेनुसार, त्याने बहिणीच्या लग्नात जायचंच नव्हतं. पण तो गेला आणि तिथे जाऊन रडला. ह्याच कारणामुळे त्याला सार्वजनिकपणे माफी मागावी लागली.
या मुलाचा माफी मागतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इतिहासकार जेलिमखान मुसाइव यांच्यानुसार, 'चेचन लग्नांमध्ये लोकांकडून त्यांच्या भावनांचं प्रदर्शन करणं योग्य मानलं जात नाही. मग ते महिला असो वा पुरूष. त्यामुळेच मुलाचा बहिणीच्या लग्नात रडण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर लोक नाराज झाले होते.
चेचन्यातील पुरूष जगात सर्वात मजबूत आणि शक्तीशाली मानले जातात. हेच कारण आहे की, त्या मुलाकडून माफी मागवली गेली. काही लोक या निर्णयावर नाराज आहेत. कारण त्यांचं मत आहे की, बहिणीच्या लग्नात तर कुणीही भावूक होऊ शकतं. अशात जर भाऊ रडला तर सार्वजनिकपणे माफीची मागणी करणं योग्य नाही.
या घटनेतील आश्चर्यकारक बाब म्हणजे लग्नात नवरीच्या परिवारातील सदस्यांची उपस्थिती किंवा त्यांच्याकडून भावनांचं सार्वजनिक प्रदर्शन करणं चेचन्यामध्ये कायद्याच्या विरोधात नाही, तर केवळ परंपरेविरोधात आहे. यासाठीच अनेक लोकांनी या परंपरेचं समर्थन करणाऱ्या सरकारवरही टीका केली आहे.