सोशल मीडियावर अनेकदा विचित्र वस्तू किंवा प्राण्यांचे फोटो व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये समुद्रकिनारी हिरव्या रंगाचा विचित्र प्राणी दिसतोय. हा प्राणी पाहून, त्याचा फोटो काढणारा व्यक्तीही चकीत झाला. फोटो व्हायरल झाल्यानंतर, काहीजण याला एलियन म्हणत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, 33 वर्षीय माइक अर्नाट सोमवारी एडिनबर्गमध्ये पोर्टोबेलो बीचवर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना समुद्रकिनारी एक विचित्र प्राणी दिसला. सुरुवातीला त्याला वाटले की, हा कचरा असेल, पण जवळ गेल्यावर, त्यात जीव असल्याचे दिसून आले. अर्नाटने सांगितल्यानुसार, हा प्राणी हिरव्या रंगाचा असून, त्याच्या अंगावर सर्वत्र काटे होते.
याबाबत अर्नाटने म्हणतो की, "मी अशाप्रकारचा विचित्र प्राणी यापूर्वी कधीच पाहिला नाही. मला त्या प्राण्याने त्याच्याकडे आकर्षित केले. हा एलियन आहे का, असा विचार माझ्या मनात आला. पण, नंतर समजले की, हा खोल समुद्रातला एखादा प्राणी आहे.'' स्कॉटिश वाइल्डलाइफ ट्रस्टच्या पीट हास्केलनेही एलियन असल्याचे खंडन केले. हा समुद्री ब्रिसल वर्म असल्याचे त्यांनी सांगितले.