अनेकदा आपण ऑनलाइन काही ना काही ऑर्डर करत असतो. काही वेळा आपल्याला एखादी वस्तू चुकीचीही मिळते किंवा काही वस्तू डॅमेजही झालेल्या मिळतात. बरेचदा कोणी त्याबाबत तक्रार करत, नाहीतर काही जण शांतपणे त्या वस्तू आपल्याकडे ठेवून घेतात. बरेचदा तुम्ही ऐकलं किंवा वाचलंही असेल की एखादा प्रोडक्ट मागवला आणि त्या ऐवजी काहीतरी दुसरंच मिळालं. पण आता आम्ही जे सांगणार आहोत, ते यापेक्षाही निराळं आहे.
केरळमधील वायनाड जिल्ह्यातील कनियाम्बेट्टा येथील रहिवाली मिथून बाबू यांच्याबाबत एक अजब घटना घडली. त्यांनी आपल्या पासपोर्टसाठी एक कव्हर मागवलं, परंतु त्यांना याऐवजी एक पासपोर्टच मिळाला. त्यांनी ही ऑर्डर अॅमेझॉनवरून दिल्याचं म्हटलं आहे.
मिथून बाबू यांनी ३० ऑक्टोबर रोजी पासपोर्टसाठी एक कव्हर ऑर्डर केलं होतं. १ नोव्हेंबर रोजी त्यांना ती ऑर्डर मिळाली. परंतु त्यांनी जेव्हा तो बॉक्स ओपन केला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या बॉक्सच्या आतमध्ये एक ओरिजनल पासपोर्ट होता. इतकंच नाही, तर तो पासपोर्ट त्यांचाही नव्हता, तो त्रिशूर येथील कुन्नमकुलम येथील रहिवासी मुहम्मद सलीम नावाच्या एका व्यक्तीचा होता.
कस्टमर केअरकडूनही अजब उत्तरत्यांनी त्वरित या घटनेची तक्रार अॅमेझॉन कस्टमर केअरकडे केली. परंतु कस्टमर केअर अधिकाऱ्याकडू आलेली प्रतिक्रियाही अधिक धक्कादायक होती. भविष्यात अशी कोणतीही घटना घडणार नाही आणि याची विक्री करणाऱ्या पुढील वेळी अधिक सावध राहण्यास सांगितलं जाईल, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. दरम्यान, त्या पासपोर्टचं करायचं काय याबाबतही त्यांना काही सांगण्यात आलं नाही. मिथून बाबू यांनी लवकरच तो पासपोर्ट त्यांच्या मूळ मालकाकडे सुपुर्द करणार असल्याचं सांगितलं.