तुम्ही पिंजऱ्यात बंद असलेले प्राणी नक्की पाहिले असतील आणि त्याचा आनंदही घेतला असेल. पण हेच प्राणी जेव्हा जंगलात असतात तेव्हा आपली हालत खराब होते. तर पिंजऱ्यात बंद प्राण्यांना डिवचण्याचा अतिशहाणपणा देखील काही जण प्राणी संग्रहालयात करताना दिसतात. अशाच एका अतिशहाण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे की जो खरंतर प्राण्यांना उगा त्रास देणाऱ्यांसाठी चांगलाच धडा ठरणार आहे.
एका प्राणी संग्रहालयात बंद पिंजऱ्यातील वाघाला एक व्यक्ती डिवचत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पण काही वेळानं या व्यक्तीसोबत जे घडतं ते अगदी धडकी भरवणारं आहे. वाघ शांतपणे पिंजऱ्यात बसून होता. तर एक व्यक्ती पिंजऱ्याच्या जाळीतून हात टाकून त्याला डिवचत होता. कधी वाघाच्या पाठीवर टोचे देत होता तर कधी त्याच्या मानेवर डिवचत होता. पण असं करताना एका क्षणाला या व्यक्तीचा हातच जाळीत अडकतो आणि त्याचा जीव टांगणीला लागतो.
जीवाच्या भीतीनं तो आपला हात पिंजऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू करतो आणि दैव बलवत्तर म्हणून त्याचा अडकलेला हात सुटतो. त्याचा हात जेव्हा पिंजऱ्यात अडकला होता त्यावेळी वाघाचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं म्हणून तो बचावला. नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं.