अनेकदा फ्लाईटमधून ट्रव्हल करताना मोबाईल नेटवर्क जातं हे माहिती असेल. ही सामान्य बाब आहे. ज्यावेळी एखादं विमान उड्डाण घेत असेल तेव्हा एअर हॉस्टेस मोबाईल फ्लाइट मोडवर ठेवण्याची विनंती प्रवाशांना करते. कारण विमानाच्या उड्डाणावेळी मोबाईलला असणाऱ्या सिग्नलमुळं अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु अलीकडेच बोस्टनमध्ये विमान उड्डाणावेळी जे काही घडलं त्याने सगळ्यांना हैराण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ सप्टेंबरची आहे. जेटब्लू फ्लाइटमध्ये अचानक गोंधळ सुरू झाला. ही फ्लाइट बोस्टनहून सैन जुआनला जात होती. या विमानात खलील नावाचा प्रवासी प्रवास करत होता. अचानक विमानात त्याला एक फोन करायची आठवण झाली. जेव्हा त्याने फोन लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा नेटवर्क नसल्याने त्याचा कॉल डिस्कनेक्ट झाला. त्यामुळे खलील खूप चिडला होता. त्याने विमानात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याने केवळ गोंधळ घातला नाही तर फ्लाइट अटेंडेंटला मारण्याचा प्रयत्न केला. त्याचसोबत फ्लाइट लँड करण्यास सांगितले.
हवेतच सुरू होतं नाटक
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, व्यक्तीने कॉल लागत नसल्याने गोंधळ घातला. हवेत सिग्नल नसल्याने त्याचा कॉल लागत नव्हता. त्यानंतर खलीलने गोंधळ घालत क्रू मेंबर्ससोबत वाद घातला. इतकचं नव्हे तर कॉकपिटमध्ये जात पायलटला प्लेन लँडिंग करण्यास सांगितले. चिडलेल्या खलीलने क्रू मेंबर्सच्या छातीवर लाथ मारून त्याला जखमीही केले. जेव्हा ही घटना घडली तेव्हा अरबी आणि स्पॅनिशमधून तो शिवीगाळ करत होता. तसेच सर्वांना जीवे मारण्याची धमकी देत होता. NBC बोस्टननुसार, त्याने एका क्रू मेंबर्सचा गळा दाबला होता. त्यानंतर क्रू मेंबर्सने एकत्र येत खलील शेखला पकडून आणि प्लेन लँडिंगपर्यंत त्याला बांधून ठेवलं. फ्लाइट लँडिंग केल्यानंतर खलीलला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीची सध्या चौकशी सुरू आहे. तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र खलीलनं विमानात घातलेल्या गोंधळामुळे इतर प्रवाशीही भयभीत झाले होते. इतका कोणता अर्जंट कॉल खलीलला करायचा होता? हा प्रश्न सगळ्यांना पडला होता.