चीनच्या प्रसिद्ध ग्लास ब्रिजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात एक व्यक्ती जवळपास ३३० फूटावर लटकलेला दिसतो. असं सांगितलं जात आहे की, ९० किमी प्रति तासाच्या वेगाने आलेल्या हवेमुळे पुलाचं नुकसान झालं. पुलाच्या काही भागावरील काचा निघाल्या होत्या. आणि ही घटना घडली तेव्हा एक व्यक्ती पुलावरच होती. नंतर बचाव दलाकडून त्याला सुखरूप खाली उतरवण्यात आलं.
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, ही घटना चीनच्या लोंगजिंग शहरमधील काचेच्या पुलावर घडली. शुक्रवारी इथे ९० किमी प्रति तासाच्या वेगाने वारे वाहत होते. ज्यानंतर पुलावरील काही काच उडून गेले. यादरम्यान फिरायला आलेली एक व्यक्ती तिथेच अडकली. तो ३३० फूट उंचीवर ब्रिजच्या रेलिंगला पकडून बराच वेळ लटकून राहिला. नंतर त्याला मोठ्या मुश्कीलीने वाचवण्यात आलं. याचे फोटो चीनच्या सोशल मीडियावर शेअऱ करण्यात आले आहेत.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ही व्यक्ती बराच वेळ पुलावर अडकून होती. नंतर बचाव दलाच्या जवानांनी त्याला सुखरूप खाली उतरवलं. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जिथे मानसोपचार तज्ज्ञांकडून त्याचं काउन्सेलिंग करण्यात आलं. कारण तो फार घाबरलेला होता.
चीनमधील प्रसिद्ध ग्लास ब्रिज लोंगजिंग शहरच्या पियान डोंगरावर स्थित एक रिसॉर्टमध्ये आहे. मोठ्या संख्येने पर्यटक इथे फिरायला येतात. पूल पार करण्यासाठी लोकांना काचेच्या फरशीवरून जावं लागतं. जे फार भीतीदायक वाटतं. दरम्यान चीनच्या हुआन प्रांताच्या चांगचियाचिए शहरातही असाच एक काचेचा पूल आहे. ज्याची लांबी ४३० मीटर इतकी आहे आणि तो सहा मीटर रूंद आहे.