जगात एकापेक्षा जास्त धोकादायक प्राणी आहेत, ज्यापासून दूर राहणंच नेहमी चागलं. नाहीतर जीवावर बेतण्याची शक्यता असते. सिंह, वाघ, बिबट्या, चित्ता आणि मगरी इत्यादी अशांचा या हिंसक प्राण्यांमध्ये समावेश आहे. पण साप हा देखील जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. जगात सापांच्या २ हजारांहून अधिक प्रजाती आढळतात असं मानलं जात असलं तरी सर्वच साप धोकादायक नसतात. यातील काही सापच विषारी असतात, तर इतर सापांच्या चाव्याचा मनुष्यावर विशेष परिणाम होत नाही. अजगर विषारी नसले तरी ते निश्चितच धोकादायक सापांमध्ये गणले जातात, कारण ते खूप मोठे आणि शक्तिशाली असतात. अशाच एका अजगराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अजगर इतके शक्तिशाली असतात की माणसाला एका दंशात संपवू शकतात. महाकाय अजगर तर हरीण किंवा शेळीसारखे मोठे प्राणी सहज गिळतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अजगर कोणाला इजा करताना दिसत नाही. पण एका व्यक्तीनं दाखवलेलं धाडस पाहता ते नक्कीच जीवघेणं ठरू शकलं असतं. तो अजगराला रस्त्यावरून बाजूला करुन अपघातापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता.
व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधारात एक महाकाय अजगर रस्त्यावर पडलेला दिसत आहे. दरम्यान, एक माणूस त्याच्याकडे जातो आणि न घाबरता अचानक अजगराचं तोंड पकडून रस्त्यावरुन त्याला बाजूला सारतो. त्यानंतर अजगर जंगलाच्या दिशेनं रेंगाळत जातो. नशीब बलवत्तर म्हणून की काय या व्यक्तीवर अजगरानं हल्ला केला नाही. या महाकाय अजगराचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ IFS अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. अवघ्या १७ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला असून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत. काहीजण हे कौतुकास्पद काम असल्याचं सांगत आहेत, तर काहीजण हे अत्यंत धोकादायकही असल्याचं म्हणत आहेत.