Uber कॅबमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून या कॅब ड्रायव्हरसोबत त्याला सुरक्षित वाटत नसल्याचं म्हटलं आहे. कॅबमध्येच त्याने हा व्हिडीओ बनवला आहे. जो सोशल मीडियावर आता जोरदार व्हायरल झाला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
वेदांत असं या प्रवाशाचं नाव आहे. प्रवासादरम्यान आलेल्या समस्या त्याने सांगितल्या. त्यांच्या या ट्विटवर Uber आणि मुंबई पोलिसांनी कमेंट केली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कॅब ड्रायव्हर फोनवर व्हिडीओ पाहताना दिसत आहे. गाडी चालवताना तो हे करत होता.
वेदांतने व्हिडीओ शेअर केला आणि त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मला आजकाल Uber मध्ये प्रवास करताना सुरक्षित वाटत नाही, चालक धोकादायक पद्धतीने गाडी चालवत आहेत. हा ड्रायव्हर फोन हातात घेऊन व्हिडीओ पाहत आहे. मुंबई वाहतूक पोलीस मुंबईत हा प्रकार घडला आहे. Uber मुंबई, हे थांबवण्यासाठी तुम्ही काय कराल?"
चालकाच्या या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुंबई पोलिसांनीही वेदांतला या विषयावर अधिक माहिती देण्यास सांगितलं. पुढील तपास करता यावा म्हणून त्यांनी घटनेचे ठिकाण विचारले. Uber इंडियानेही या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे आणि अशा प्रकारचे वर्तन स्वीकारत नसल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1.46 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.