आपल्या लेकरानं शिक्षण घेऊन खूप मोठं व्हावं आणि आपलं नाव कमवावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. लेकराच्या यशासाठी अनेक अडचणींचा पालकांना सामना करावा लागतो. पदराला मूरड घालून आई आपल्या लेकराला मोठं करत असते. मुलं जेव्हा यशस्वी होतात. समाजात नाव कमावतात आणि लाखो रुपयांची पॅकेजेस घेऊ लागतात तेव्हा आपल्या यशासाठी आई-वडिलांनी केलेली मेहनत मुलांनी कधीच विसरता कामा नये. मुलांसाठी भोगलेली संकटं किंवा करावे लागलेले कष्ट यामागे आई-वडिलांची फक्त एकच इच्छा असते ती म्हणजे आपल्या लेकरानं मोठं व्हावं. इतर कोणतीच इच्छा आई-वडिलांच्या मनात नसते. ज्या आईमुळे आपण आज सुख-सोयी उपभोगत आहोत त्याची अनुभूती एकदा तरी आईलाही मिळावी यासाठी एका मुलानं उचललेलं पाऊल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सिंगापूरमध्ये कामाला आणि वास्तव्याला असलेल्या दत्तात्रय नावाच्या मराठी तरुणानं आपल्या आईला सिंगापूरची सैर घडवली आहे. लिंक्डइनवर त्यानं केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. अवघं आयुष्या संसारात रमलेल्या आणि मुलासाठी अपार कष्ट सोसलेल्या आपल्या आईला त्यानं पहिल्यांदाच विमान प्रवास घडवला. थेट सिंगापूरला नेऊन त्यानं आईला आपण कुठं काम करतो ती कंपनीही दाखवली. लेकाची प्रगती पाहून आईला अश्रू अनावर झाले. या सर्व भावना दत्तात्रय यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.
दत्तात्रय पोस्टमध्ये म्हणतात..."काल मी माझ्या आईला जगाचा एक सुंदर भाग दाखवण्यासाठी सिंगापूर येथे आणू शकलो आणि आजच मी तिला माझं ऑफीस आणि शहराचा परिसर दाखवण्यासाठी घेऊन जाण्याचं ठरवलं. तिच्या ज्या भावना आणि आनंद ती अनुभवत आहे ते शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. कल्पना करा, ज्या महिलेनं आपलं संपूर्ण आयुष्य खेड्यात घालवलं आणि तिनं विमानही कधी जवळून पाहिलेलं नाही. आज ती परदेशात प्रवास करणारी तिच्या पिढीतील पहिली आणि माझ्या गावातील दुसरी महिला (अर्थात पहिली माझी पत्नी आहे)", असं दत्तात्रय यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. सोबत दत्तात्रय यांनी आपल्या आईसोबतचे दोन फोटो अपलोड केले आहेत. या पोस्टवर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे.
"माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी हा खूप खास क्षण आहे. मला दुखावणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे माझ्या वडिलांनी हे अनुभवायला हवं होतं! मी खरोखरच प्रवास केलेल्या किंवा प्रवास करण्याच्या बेतात असलेल्यांनी आपल्या पालकांनाही जगाची सैर घडवा. माझ्यावर विश्वास ठेवा, त्यांचा आनंद मोजता येण्यापलीकडचा असतो. सिंगापूरला जाण्यापूर्वीच मी माझ्या आईला घेऊन येणार हे ठरवलं होतं, मी प्रवास करण्यापूर्वीच हे माझं ध्येय होतं", असंही दत्तात्रय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.