मुका जीव कारणाशिवाय माणसांना दुखापत पोहोचवत नाही. आपल्याला धोका आहे किंवा कुणी त्रास देत असेल तर प्राणी माणसांवर हल्ला करतात. काही माणसंही अशी असतात जे मुद्दामहून मुक्या जीवांना त्रास देतात. एका तरुणाने हिरोगिरी दाखवण्याच्या नादात असाच एका बैलाशी पंगा घेतला आणि ते त्याच्याच अंगलट आलं. बैलाने त्याची अशी भयंकर अवस्था केली की हिरोगिरी कसली, स्वतःच्या पायावर उभं राहून नीट चालण्याच्याही अवस्थेत तो राहिला नाही (Bull attack on man).
रस्त्यावर उभ्या असलेल्या एका शांत बैलाला भडकवण्याचा प्रयत्न या तरुणाने केला. त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल. यापुढे बैलासमोर उभं राहण्याची हिंमतही तो करणार नाही. ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक बैल रस्त्यावर शांत उभा आहे. इतक्यात एक सफेद रंगाचा शर्ट आणि टोपी घातलेला तरुण त्याच्यासमोर येतो. बैलासमोर येऊन तो टाळी वाजवतो. टाळी वाजवून वाजवून बैलाला चिडवण्याचा प्रयत्न करतो. बैल सुरुवातीला शांत दिसतो म्हणून तरुण त्याच्या जास्त जवळ जातो. तरुणाचं कृत्य पाहून बैल चवताळतो. त्यानंतर तो तरुणावर धावून जातो.
बैलाला चवताळलेला पाहताच तरुण तिथून पळू लागतो. एका खांबाजवळ तो येतो आणि खांबाभोवती गोल फिरतो. त्याला वाटलं बैल आपल्या मागूनच येईल आणि आपण दुसऱ्या दिशेने पळून जाऊ. पण होतं उलटंच. बैल खांबाच्या दुसऱ्या दिशेने येतो. त्यामुळे तरुण बैलाच्या तावडीत सापडतो.
बैल त्याला आपल्या शिंगावर धरून गरागरा फिरवतो आणि जमिनीवर आपटतो. बराच वेळ तो त्याच्यावर हल्ला करतो. तिथं इतर लोकही उपस्थित आहेत. तेसुद्धा बैलाचा हल्ला पाहून घाबरतात आणि मोठमोठ्याने ओरडतात. पण बैलाचं रौद्र रूप पाहून तरुणाला वाचवण्याची हिंमत कुणातच होत नाही.
अखेर तरुण जमिनीवर पडतो. त्यानंतर बैल शांतपणे तिथून निघून जातो. त्यावेळी इतर लोक तरुणाजवळ येतात. तरुणाची अवस्था इतकी भयानक झाली आहे की त्याचं शरीर हलतानाही दिसत नाही आहे. तो अर्धमेलाच झाला आहे. लोक त्याला जमिनीवरून उचलून घेऊन जातात.