काही लोक इतके गुणी असतात की, ते स्वत:ला अव्वल दर्जाचे हुशार समजतात. म्हणजे बघा अनेकजण वेगवेगळ्या गोष्टींची तस्करी करण्यासाठी काहीच्या काही शक्कल लढवतात. हेच बघा ना एका व्यक्तीने चरसची तस्करी करण्यासाठी चक्क भुईमूगाच्या शेंगांचा वापर केला. त्याला वाटलं की, त्याची ही आयडिया कुणाच्याच लक्षात येणार नाही. पण एअरपोर्टवर त्याला पकडण्यात आले. जगभरात अम्ली पदार्थांच्या तस्करीवर बंदी आहे तरी सुद्धा काही लोक वेगवेगळ्या मार्गाने तस्करी करतातच.
या गोष्टीचा खुलासा Quora.com या वेबसाइटवर झाला. या प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता की, एअरपोर्टवर कस्टममध्ये सर्वात अनोखी गोष्ट काय पाहिली? याचं उत्तर कस्टम विभागात ५ वर्षांपासून काम करणारे नॉरबर्ट अल्मेडा यांनी दिलं. त्यांनी लिहिलं की, 'मी माझ्या कार्यकाळात कासव, विंचू, खाण्याच्या वस्तू आणि ड्रग्सची तस्करी पाहिली'.
अल्मेडाने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, एकदा एअरपोर्टवर ड्रगने भिजलेली कार्पेट आढळली होती. डुप्लिकेट स्क्रीन असलेले कॉम्प्युटर, सूटकेस मिळणे सामान्य बाब आहे. इतकेच नाही तर अनेक तस्कर तर व्हीलचेअरमध्ये ड्रग्स भरून घेऊन जाताना पकडले गेले. सर्वात भन्नाट तर भुईमूगाच्या शेंगांमध्ये चरसची तस्करही होती.
रिपोर्टनुसार, इस्लामाबाद एअरपोर्टवर एका व्यक्तीला एअरपोर्टवर रोखलं होतं, त्याचं नावं होतं रियाज. रियाजकडे भुईमूगाच्या शेंगांनी भरलेली एक प्लॅस्टीक बॅग होती. जेव्हा कस्टमवाल्यांनी या शेंगा निरखून पाहिल्या तेव्हा त्यांनी संशय आला. त्यांनी शेंगा फोडून पाहिल्या तर त्यांना धक्काच बसला. कारण त्यात ड्रग्स भरलेलं होतं. पूर्ण एक किलो चरस.
चरस मिळाल्यावर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. सोबतच त्याच्या क्रिएटीव्हिटीला सलामही केली. म्हणजे त्याला अटक केली आणि त्याच्या विरोधात केस दाखल केली. रियाजचा हा कारनामा वाचून यूजर्सही हैराण झालेत. काही तर म्हणाले की, त्याला अवॉर्ड दिला जावा.