बंगळुरु – पावसाळा अगदी तोंडावर आलेला असताना शहरात मोठ्या नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर येतो, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर नालेसफाईच्या मुद्द्यावरुन अक्षरश: तुटून पडतात. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करताना एखादा पालिका कर्मचारी अथवा मजूर तुम्ही पाहिला असेल ना, पण कर्नाटकच्या मंगलोर शहरात नालेसफाई करताना एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे, त्याला कारणही तसेच आहे.
पाऊस पडल्यानंतर शहरातील रस्त्यावर पाणी साचल्याची तक्रार नगरसेवक मनोहर शेट्टी यांना मिळताच ते तात्काळ त्याठिकाणी पोहचले आणि नालेसफाई करण्यासाठी नाल्यात उतरले. याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियात या नगरसेवकाचं भारी कौतुक होत आहे. अनेकदा मॅनहोलमध्ये उतरुन सफाई करताना कर्मचारी आणि मजूर एखाद्या दुर्घटनेत बळी पडतानाच्या बातम्या येतात. त्यामुळे अशा कामात क्वचितच काही लोक पुढे सरसावतात.
मंगलोरमधील भाजपाचे नगरसेवक मनोहर शेट्टी हे मॅनहोलमध्ये उतरले आणि साफसफाई करुन बाहेर पडले. शेट्टी हे कादरी दक्षिणी वार्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मॅनहोलमध्ये उतरल्याचे त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. मंगलोरच्या कादरी कंबाला परिसरात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. ज्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होते.
मजुरांना साफसफाई करण्यासाठी बोलावले परंतु त्यांनी मॅनहोलमध्ये उतरण्यास नकार दिला. इतक्यात नगरसेवक मनोहर शेट्टी यांनी स्वत: मॅनहोलमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. शेट्टी यांनी मॅनहोलमध्ये उतरत नाल्याची सफाई केली. शेट्टी यांनी याबाबत सांगितले की, मी जेट ऑपरेटरला आतमध्ये जाऊन कचऱ्याची सफाई करण्यास सांगितले ज्यामुळे पाइपलाइन साफ होईल. पण त्याने नकार दिला. कोणीही तयार नव्हते. त्यानंतर मी मॅनहोलमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. मला अंधारात मॅनहोलमध्ये उतरताना पाहून माझ्या पक्षाचे ४ कार्यकर्तेही आत उतरले. टॉर्चच्या सहाय्याने आम्ही आतमध्ये सफाई केली. यासाठी अर्धा दिवस गेला. पण आम्ही आतमध्ये अडकलेला कचरा साफ केला. ज्यामुळे पाइपलाइन क्लिअर झाली आणि साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली असं त्यांनी सांगितले.
तसेच आपण फक्त गरीब लोकांनाच मॅनहोलमध्ये जाण्यासाठी दबाव टाकू शकत नाही. जर काही झाले त्याला जबाबदार कोण? त्यामुळे मी आतमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. व्हायरल झालेल्या फोटोवर ते म्हणाले की मी हे सगळं लोकप्रियतेसाठी केले नाही. माझ्या कर्तव्याचा तो भाग होता. आपल्याला लोकांनी निवडून दिले आहे. जर लोकांची कोणतीही काम आपण लवकर करु शकत असू तर ते आवश्य केले पाहिजे. मंगलोरमध्ये प्रचंड जोरात पाऊस येतो, त्यामुळे जास्तवेळ आम्ही वाट पाहू शकत नव्हतो असं नगरसेवक मनोहर शेट्टी यांनी सांगितले.