देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट थोपवायची असल्यास लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला म्हणजेच अडीच कोटी लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला. मात्र त्यानंतर हा आकडा खाली आला. लसीकरणाचा वेग वाढवण्याचं आव्हान समोर असताना नागरिकांच्या मनातील भीती काढण्याचं आव्हानदेखील प्रशासनासमोर आहे.
अनेकांच्या मनात लसीबद्दल भीती आहे. तर काहींना इंजेक्शनची भीती वाटते. त्यामुळे अशा व्यक्ती लसीकरणापासून दूर राहतात. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लसीची भीती वाटणाऱ्या एका मित्राला त्याच्या तीन मित्रांनी पकडून लसीकरण केंद्रावर नेलं. मात्र मित्र लस घेण्यास तयार नव्हता. तो वैद्यकीय कर्मचाऱ्याजवळ जायलाच तयार नव्हता.
लस घेताना त्रास होत नाही. अवघ्या काही सेकंदांत लस टोचून होते, असं सांगण्याचा प्रयत्न मित्रांनी करून पाहिला. त्यांनी त्याला शक्य तितकं प्रोत्साहन दिलं. पण मित्र काही ऐकेना. अखेर तीन मित्रांनी त्याला केंद्राच्या दारात आडवं केलं. त्यानंतर वैद्यकीय कर्मचारी लगेच तिथे आल्या आणि त्यांनी लस टोचली. ही घटना मध्य प्रदेशातल्या बुंदेलखंडातली असल्याचं सांगितलं जात आहे.