ऐकावं ते नवलंच! अवघ्या 45 हजारात मारुती 800 ला बनवलं 'रॉल्स रॉयस', पाहा Video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 19:05 IST2023-10-01T19:04:31+5:302023-10-01T19:05:41+5:30
केरळच्या तरुणाचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

ऐकावं ते नवलंच! अवघ्या 45 हजारात मारुती 800 ला बनवलं 'रॉल्स रॉयस', पाहा Video...
Trending Video: मारुती सुझुकी कंपनीच्या मारुती 800 गाडीची भारतात जबरदस्त क्रेझ होती. या कारची लॉन्चिंग 9 एप्रिल 1983 रोजी झाली होती. या गाडीने जगासमोर भारताची प्रतिमाच बदलून टाकली. ज्या देशातील लोक एकेकाळी पायी, सायकल, बस आणि ट्रेनने प्रवास करायचे, त्या देशातील सामान्य माणसाचे स्वत:ची चारचाकी वाहन खरेदी करण्याचे स्वप्न या कारने पूर्ण केले.
या कारने लोकांना इतके प्रभावित केले होते की, अवघ्या 2 महिन्यांत 1.35 लाख कारचे बुकिंग झाले होते. नंतर काळ बदलला आणि भारतीय बाजारात वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले. पम, आजही अनेक लोकांकडे ही कार आहे. अनेकांनी या कारला मॉडिफाय केले आहे. अशीच एक कार सध्या इंटरनेटवर व्हायरल झाली आहे.
केरळच्या हदीफ नावाच्या एका तरुणाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात चक्क मारुती 800 कारला रॉल्स रॉयस गाडीचे रुप देण्यात आल्याचे दिसत आहे. दुरुन पाहिल्यावर ही कार रॉल्स रॉयसच दिसते. विशेष म्हणजे, हे सर्व त्याने अवघ्या 45 हजार रुपयांमध्ये केले आहे. त्याच्या या व्हिडिओला हजारो व्ह्यू आले आहेत.