नवी दिल्ली : सततच्या कामातून काही दिवस सुटका मिळावी अशी प्रत्येक कर्मचाऱ्याची इच्छा असते. आपल्या कंपनीच्या बॉसने अचानक 10-12 दिवसांची सुट्टी जाहीर केली तर किती बर होईल असे अनेकांना वाटत असते. मात्र ई-कॉमर्स कंपनी मीशोने आपल्या कर्मचाऱ्यांची ही इच्छा पूर्ण केली आहे. कर्मचारी आनंदी असतील तर त्यांचे मानसिक आरोग्यही चांगले राहील, असा विश्वास मीशोला आहे. कर्मचारी खुश असतील तर ते अधिक मेहनत करतील. त्यामुळे कंपनीने 11 दिवस सुट्टी जाहीर केली आहे.
मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी कंपनीने सलग दुसऱ्या वर्षी 11 दिवसांसाठी 'रीसेट ॲंड रिचार्ज ब्रेक'ची घोषणा केली आहे. मीशोने आपल्या वेबसाइटवरून याबाबत माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा दूर करणे हा या सुट्यांमागील कंपनीचा उद्देश असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सणासुदीच्या काळानंतर कंपनी कर्मचाऱ्यांना या सुट्ट्या देणार आहे. सणासुदीनंतर म्हणजेच 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत या सुट्ट्या देण्यात येणार आहेत.
'रीसेट ॲंड रिचार्ज ब्रेक'साठी ब्रेककंपनीचे संस्थापक संजीव बर्नवाल यांनी ट्विटवरून घोषणा करताना म्हटले, "आमचे प्रमुख उद्दिष्ट आमच्या कर्मचाऱ्यांना मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवणे आहे. सलग दुसऱ्या वर्षी आम्ही कर्मचाऱ्यांसाठी 11 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. आगामी काळात येणाऱ्या सणांनंतर, मीशोचे कर्मचारी 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या सुट्ट्यांचा उपयोग त्यांचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी करू शकतील. कर्मचारी या सुट्ट्यांचा उपयोग आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी किंवा कुठेतरी प्रवास करण्यासाठी करू शकतात."
मीशो कंपनीचे संस्थापक आणि सीईओ विदित आत्रे यांनी देखील याबाबत ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, अंतराळवीरांनाही विश्रांतीची गरज असते आणि कंपनीत 'मूनशॉट मिशन'वर काम करणाऱ्या लोकांनाही याची गरज असते.