मिस कोहिमा 2019 स्पर्धेतील एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 'मिस कोहिमा ब्यूटी पीजेंट 2019' ही सौंदर्य स्पर्धा नागालँड येथे पार पडली. या स्पर्धेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या स्पर्धेतील स्पर्धक वीक्यून्यो साचू (Vikuonuo Sachu) हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
वीक्यून्यो शेवटच्या फेरीमध्ये परीक्षकांकडून 'तुला जर पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर तू त्यांच्याशी काय बोलशील?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर वीक्यून्योने 'जर मला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर मी त्यांना सांगेन की त्यांनी गायींवर लक्ष देण्यापेक्षा भारतातील महिलांच्या परिस्थितीकडे लक्ष केंद्रित करावं' असं उत्तर दिलं. वीक्यून्योचं हे भन्नाट उत्तर ऐकून सर्वच हसू लागले. उत्तराचा हा व्हिडीओ सर्वाचं लक्ष वेधून घेत असून जोरदार व्हायरल होत आहे. 'मिस कोहिमा ब्यूटी पीजेंट 2019' ही स्पर्धा 5 ऑक्टोबर रोजी पार पडली आहे. वीक्यून्यो ही स्पर्धेची सेकंड रनरअप ठरली आहे. तर Khrienuo Liezietsu ने मिस कोहिमाचा किताब पटकावला आहे.