द्रुतगती महामार्गावर घसरून पडलेल्या एका दुचाकीस्वाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुचाकीवरून रस्त्यावर पडलेल्या तरुणाला मागून येणारा एक ट्रक धडक देणार होता. मात्र त्याचा जीव थोडक्यात वाचला. २४ जानेवारीला दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी ही घटना घडल्याचं वृत्त उतुसान टीव्हीनं दिलं. मात्र ही घटना नेमकी कुठे घडली याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
एका तरुणाची दुचाकी द्रुतगती महामार्गावर घसरली. त्यानं स्वत:ला सावरलं. तितक्यात त्याला मागून ट्रक येताना दिसला. ट्रक तरुणाला धडक देणार असं वाटत असताना तरुणानं प्रसंगावधान दाखवलं. अपघात टाळण्यासाठी तरुणानं दुसऱ्या लेनच्या दिशेनं धाव घेतली. तरुणानं धाव घेण्यास काही सेकंद उशीर केला असता तर मोठा अनर्थ घडला असता. (व्हिडीओ सौजन्य- डेली मेल)
भरधाव येणारा ट्रक पाहून तरुण लगेच दुसऱ्या लेनच्या दिशेनं धावला. अवघ्या काही सेकंदांमुळे मोठा अपघात टळला. सुदैवानं दुसऱ्या लेनमधून कोणतंही वाहन येत नसल्यानं तरुणाचा जीव बचावला. हा अपघात नेमका कशामुळे झाला त्यावरून सोशल मीडियावर विविध तर्क लढवले गेले. रस्ता निसरडा असल्यानं तरुण घसरला असावा, दुचाकीचा स्टँड खाली असल्यानं तरुण पडला असावा अशा शक्यता अनेकांनी व्यक्त केल्या.
अपघातातून बचावलेल्या तरुणानं मात्र वेगळंच कारण सांगितलं. दुचाकीस्वाराच्या लेनमध्ये अचानक दुसरी कार आली. त्यामुळ त्यानं दुचाकीचा वेग कमी करण्यासाठी पायाचा वापर केला. त्याचवेळी दुचाकी घसरली आणि तो तरुण रस्त्यावर पडला.