आपल्याला शहरात कुठेही बाहेर फिरण्यासाठी रिक्षाची मदत घ्यावी लागते. ट्राफिकमधून वेळेत इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी रिक्षा ही एकमेव पर्याय असते, रिक्षाचे भाडेही प्रमाणात असतं. यामुळे रिक्षाला जास्त मागणी असते. आपल्याकडे रिक्षा सजवण्याची पद्धतही मोठ्या प्रमाणात आहे, मुंबईसह, पुणे, कोल्हापुरात गेलात तर तुम्हाला अनोख्या रिक्षा पाहायला मिळतील. सध्या मुंबईतील एक रिक्षा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या रिक्षात प्रवाशांसाठी मीनरल वॉटर, वर्तमानपत्र, बिस्किटांची व्यवस्था केली आहे. प्रवाशांची जास्तच काळजी या रिक्षावाल्याने घेतल्याचे दिसत आहे.
ऑटो चालकांचे जग खूप वेगळे आहे. त्यांना लोकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते तर कधी कुणाचे बोलणे ऐकून घ्यावे लागते, मात्र तरीही ऑटोचालक प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न करतात. मुंबईतील एका ऑटो चालकाची सध्या जोरदार चर्चा होत आहे, जो प्रवासादरम्यान आपल्या प्रवाशांना भरपूर सेवा देतो. तो त्याच्या रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्यांना मोफत बिस्किटे, पाणी आणि वर्तमानपत्रे देत आहे.
एका ट्विटर युझरने हा रिक्षाचा फोटो ट्विट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "हावभाव महत्त्वाचे आहेत. मुंबईचे रिक्षावाले मोफत पाणी देत आहेत. हे पाहून खूप समाधान मिळते. #SpreadKindness." यासोबतच त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे ज्यामध्ये ड्रायव्हरच्या सीटच्या मागे दोन छोटे रॅक दिसत आहेत, ज्यामध्ये पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटांची पाकिटे ठेवली आहेत.
या रिक्षाच्या मागील सीटजवळ एक रॅक आहे, या रॅकमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि वर्तमानपत्र ठेवली आहे, तर खाली बिस्किटेही दिसत आहेत. हे सर्व प्रवाशांना मोफत दिली जातात. दरम्यान, सोशल मीडियावर ही रिक्षा चांगलीच व्हायरल झाली आहे.