'द किंग्स' हे नाव तुम्ही कधीना कधी ऐकलं असेलच. 'द किंग्स' हा मंबईचा हिप-हॉप डान्स ग्रुप आहे. भारतात आधीच लोकप्रिय असलेल्या या डान्स ग्रुपला आता जगभरात ओळखलं जाणार आहे. भारतातील हा पहिला असा डान्स ग्रुप आहे ज्याने अमेरिकेतील डान्स रिअॅलिटी शो 'वर्ल्ड ऑफ डान्स' जिंकला आहे.
या ग्रुपच्या सदस्यांनी फायनलमध्ये असाकाही अफलातून परफॉर्मन्स दिला की, तीनही परिक्षकांना जागेवरून उठावं लागलं. तर प्रेक्षकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. या शोसाठी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेज, Ne-Yo आणि Derek Hough हे परिक्षक होते. या ग्रुपला बक्षिस म्हणूण १ मिलियन डॉलर मिळाले आहेत.
'द किंग्स' या डान्स ग्रुपमध्ये एकूण १४ सदस्य असून त्यात १७ ते २७ वयोगटातील तरूणांचा समावेश आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या ग्रुपने नेहमीच आपल्या आकर्षक आणि वेगळ्या डान्सने सर्वाचं भरभरून मनोरंजन केलं आहे. याआधीही हा ग्रुप २०१५ मध्ये 'वर्ल्ड हिप हॉप चॅम्पियनशिप'मध्ये रनर-अप ठरला होता. तर 'इंडियाज गॉट टॅलेन्ट'चा तिसरा सीझन त्यांनी जिंकला होता. सोशल मीडियातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
जगभरातील एकापेक्षा एक सरस डान्स ग्रपसोबत किंग्समधील डान्सर्सची स्पर्धा होती. त्यांना मागे टाकत या ग्रुपने आपला वेगळा ठसा उमटवला. आणि आता ते जगभरात आपल्या डान्सने ओळखले जाणार आहेत.