Viral Video: सध्या मुंबईतील दोन तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. या तरुणांनी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये चक्क फाईव्ह स्टार रेस्टॉरंट सुरु केलं आहे. लोकल हा सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जास्तीत जास्त मुंबईकर आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा इतरत्र जाण्यासाठी लोकल ट्रेनचा वापर करतात.
मुंबईची लोकल आणि गर्दी हे समीकरण मुंबईकरांना अंगवळणी पडलेलं आहे. रहदारीच्या वेळी तर लोकलमध्ये प्रवाशांना पाय ठेवण्यासाठी देखील जागा नसते. लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील. पण या लोकलमध्ये चक्क रेस्टॉरंट सुरू करण्याचा कुणी विचार तरी करु शकेल का? पण दोन तरुणांना ही हटके कल्पना सुचली आणि त्यांनी चक्क लोकलमध्येच चालतं-फिरतं रेस्टॉरंट सुरू केलं. लोकलच्या डब्यात छोटे आणि तात्पुरते रेस्टॉरंट उघडून त्यांनी प्रवाशांना आश्चर्याचा धक्काच दिला.
सोशल मीडियात याचा व्हिडिओ व्हायरल होत असून या तरुणांनी आपल्या नव्या स्टार्टअपची माहिती दिली आहे. आर्यन कटारिया आणि सार्थक सचदेवा अशी या तरुणांची नावे आहेत. दरम्यान या युनिक स्टार्टअपला त्यांनी 'टेस्टी टिकट' असं नाव दिलं आहे. व्हिडिओमध्ये हे दोघं तरुण आपल्या नव्या व्यवसायाची माहिती देणारं इनव्हाइट कार्डचं वाटप करतानाही दिसतात.
मुंबईकर प्रवासी काय म्हणाले? या दोन तरुणांच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही जेव्हा आमच्या नव्या स्टार्टअपचे इनव्हाइट कार्ड प्रवाशांना दिलं, तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून आम्ही भारावून गेलो'. मुंबई लोकलमध्ये अशा पद्धतीचा व्यवयाय सुरू केला जाऊ शकतो, ही कल्पना सर्वसामान्य प्रवाशांना मान्यच नव्हती.
प्रवाशांनी घेतला जेवणाचा आस्वादसोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये हे दोन तरुण प्रवाशांना गरमा-गरम जेवण सर्व्ह करताना दिसून येत आहेत. जिलबी, मॅगी सोबत टोमॅटो सॉस इतकेच नाही तर स्वीट डिशचा सुद्धा त्यात समावेश आहे. त्यातील काही हौशी प्रवाशांना या तरुणांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.
येथे पाहा व्हिडिओ: