कोरोना व्हायरसच्या संकटात घरात बसून बसून अनेकांना आतापर्यंत बराच कंटाळा नक्की आला असेल... त्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर अनेकांनी गावी किंवा कुठेतरी भटकंतीला जाण्याचा प्लान नक्की आखला असेल. पावसाळा म्हणजे वन्य प्रेमींसाठी भटकंटीचा हक्काचा ऋतू, परंतु यावेळी कोरोनामुळे त्यांनाही घरीच थांबावं लागलं आहे. पण, परदेशात प्रवासावरील बंधन काही प्रमाणात शिथिल केली गेली आहेत. त्यामुळे भटकंतीलाही सुरुवात झाली. पण, या फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीसाठी भटकंतीचा हा अनुभव नेहमी लक्षात राहिल असा ठरला.
जर्मनीतील बर्लिन येथील हा प्रसंग आहे. एका रानटी डुक्कराच्या मागे विवस्त्र व्यक्ती पळताना दिसत आहे. डुक्करानं त्या व्यक्तीची लॅपटॉप पिशवी पळवली आणि त्यानंतर ती व्यक्ती त्याच्या मागे पळत सुटली. बर्लिन येथील ग्रुनवेल जंगलात सनबाथला परवानगी देण्यात आली आहे. टीऊफेल्सी तलावात ही व्यकीत आंघोळीचा आनंद घेत होती. त्यावेळी एक मादा डुक्कर तिच्या दोन पिल्लांसह काहीतरी खायला मिळतेय का, हे पाहण्यासाठी आली. त्यानंतर जे घडलं ते हास्यास्पद ठरलं. (Naked man chases wild boar after it steals his laptop)
अॅडेल लँडौर या महिलेनं फेसबुकवर हे फोटो पोस्ट केले आहेत. तिनं लिहिलं की,''निसर्गाचा पलटवार! जंगली डुक्करानं केली शिकार! डुक्करानं पळवलेल्या पिवळ्या पिशवीत त्या माणसाचा लॅपटॉप आहे आणि तो परत मिळवण्यासाठी त्यानं स्वतःला झोकून दिले. लॅपटॉपची पिशवी परत मिळवून माघारी परतलेल्या व्यक्तीला जेव्हा लोकांनी त्याचे फोटो दाखवले, तेव्हा त्यालाही हसू आवरले नाही. त्याच्या परवानगीनं मी हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.''(Naked man chases wild boar after it steals his laptop)
फेसबुकवर पोस्ट केलेल्या फोटोंना 12 हजाराहून अधिक शेअर मिळाले, तर 8 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले. मादा डुक्कर आणि तिची पिल्लं खाण्याच्या शोधात तिथे आली होती. या संपूर्ण प्रसंगाची माहिती अॅडेलनं इंस्टाग्रामवर दिली आहे. त्या व्यक्तीप्रमाणे तिथे अनेक जण सनबाथ करण्यासाठी आले होते. अचानक त्यांच्यात डुक्कराचं कुटुंब दाखल झाल्यानं सर्व घाबरले. त्यावेळी ती व्यक्ती तलावात स्विमिंग करत होती. तेव्हा तलावाकाठी असलेल्या त्याच्या बॅगेतून डुक्करांनी आधी पिझ्झा खाल्ला... त्यानंतर ते खायला आणखी काही मिळतंय का, हे शोधू लागले. त्यातच त्यांना ती पिवळी पिशवी दिसली आणि ती घेऊन जाऊ लागले. त्या पिशवीत लॅपटॉप आहे हे लक्षात येताच, व्यक्तीनं डुक्कराच्या मागे धावण्यास सुरुवात केली. पिशवी घेऊन परतल्यानंतर सर्वांनी त्याचे टाळ्याच्या कडकडाटात स्वागत केले.
जर्मनीच्या काही समुद्र किनाऱ्यांवर आणि तलावांच्या येथे लोकांना free body culture संस्कृतीमुळे विवस्त्र सनबाथ आणि स्विमिंग करण्याची परवानगी आहे.