बंगळुरू: कर्नाटकमध्ये एक दुचाकीस्वार अपघातातून थोडक्यात बचावला आहे. बसनं अचानक यू टर्न घेतल्यानं दुचाकीस्वाराचं नियंत्रण सुटलं. मंगळुरूतील इलियार पडावू रस्त्यावर ही घटना घडली. या रस्त्यावर फारशी वर्दळ नसते. दुचाकीस्वाराचं नशीब बलवत्तर असल्यानं तो अपघातातून सुखरुप बचावला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मंगळवारी एक खासगी बस मंगळरूहून इलियार पडावूला जात होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. इलियार पडावूला पोहोचल्यानंतर बसच्या चालकानं यू टर्न घेण्यास सुरुवात केली. चालकानं अचानक यू टर्न घेतला. त्यावेळी त्यानं भरधाव येणारी स्कूटर पाहिली नाही. भरधाव येणाऱ्या स्कूटरवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यू टर्न घेताना बस चालकानं जवळपास संपूर्ण रस्ता व्यापला. त्यामुळे दुचाकी आणि बसची धडक अटळ वाटत होती. मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिशय अरुंद जागेतून दुचाकीस्वारानं दुचाकी नेली. त्यानंतर दुचाकीनं बराका मत्स्य प्रक्रिया केंद्राच्या गेटला धडक दिली. मात्र ही धडक फारशी गंभीर नव्हती. पुढे दुचाकी झाड आणि एका दुकानामध्ये असलेल्या लहानशा जागेतून पुढे गेली. दैव बलवत्तर असल्यानं दुचाकीस्वाराचा अपघात थोडक्यात टळला.