Viral Video: तुमच्यापैकी अनेकांना अंतराळातील ग्रह, तारे किंवा एलियन्सबद्दल जाणून घेण्याची इच्छा असेल. अनेक वर्षांपासून अंतराळ संशोधकही या विश्वाबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी पृथ्वी किंवा स्पेस स्टेशनवरुन इतर ग्रहांची/ताऱ्यांची छायाचित्रे घेत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वंडर ऑफ सायन्स नावाच्या X अकाऊंटवरुन शेअर केलेला हा व्हिडिओ NASA च्या स्पेस सेंटरने घेतला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्यापैकी अनेकांना हा मंगळ किंवा बुध ग्रहाचे फोटो असल्याचे वाटेल, पण हा व्हिडिओ इतर कोणत्याही ग्रहाची नसून आपल्याच पृथ्वीचाच आहे.
स्पेस स्टेशनमधून घेतलेला हा व्हिडिओ पृथ्वीच्या विशाल सहारा वाळवंटातील आहे. या प्रचंड वाळवंटामुळे असे वाटते की, हा भलताच कुठलातरी ग्रह आहे. या व्हिडिओमध्ये वाळवंटात उठणारी वादळे, आणि ढगांमुळे पृथ्वी एलियन ग्रहासारखा दिसतीये. हा ग्रह प्रत्यक्षात पृथ्वी असल्याचे व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्येही स्पष्ट करण्यात आले आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, पृथ्वीवरच असे विहंगम ढग आणि वादळे दिसू शकतात, तर मग आपल्याला एलियन्सची गरजच काय?
असे आहे सहारा वाळवंट...आफ्रिकेच्या उत्तर भागात असलेले सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठे आणि उष्ण वाळवंट आहे. मोरोक्को, अल्जेरिया, इजिप्त, लिबिया, सुदान आणि ट्युनिशिया यांसारखे जगातील अनेक देश या वाळवंटात किंवा जवळ स्थायिक आहेत. बहुतांश सहारा वाळवंट नापीक असून, कुठे खडकाळ, कुठे सपाट, तर कुठे पर्वत आणि कोरड्या दऱ्यांनी व्यापलेला आहे. येथे उन्हाळ्यात तापमान 58 अंशांपर्यंत पोहोचते. साहजिकच इथली परिस्थिती मानवांसाठी खूप कठीण आहे, त्यामुळे इथली लोकसंख्याही विरळ आहे.