कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 3 कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची एकूण संख्या 39,170,483वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1,102,926 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. लाखो लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. अशातच एका नवजात बाळाचा फोटो सोशल मीडियावर सुपरहिट ठरला आहे.
जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना एका तान्हुल्याचा फोटो "शुभ संकेत" ठरत आहे. सोशल मीडियावर नवजात बाळाचा हा फोटो जोरदार व्हायरल झाला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना हा फोटो खास ठरला आहे. नुकतेच जन्माला आलेले बाळ डॉक्टरच्या चेहऱ्यावरील मास्क काढत असल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. बाळाची ही कृती शुभ संकेत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. हा फोटो शुभ संकेत असून लवकरच संपूर्ण जगाची मास्कपासून सुटका होणार असल्याचा विश्वास काहींनी व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या संकटात फोटो ठरतोय आशेचा किरण
संयुक्त अरब अमिरातीमधील गायनोकॉलोजिस्ट डॉ. सामीर चेईब यांनी हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही दिवसांपूर्वीच शेअर केला आहे. कमी कालावधीत हा फोटो प्रचंड लोकप्रिय झाला आहे. तसेच अनेकांनी कोरोनाच्या संकटात बाळाची ही कृती आशेचा किरण असल्याचं म्हटलं आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर डॉ. सामीर यांनी त्याला हातात घेतलं. त्यावेळी नवजात बाळाने त्यांच्या चेहऱ्यावरील मास्क पकडले आणि खेचले. बाळाच्या या कृतीमुळे डॉक्टरांनाही हसू आवरले नाही. लवकरच आपण सर्वजण मास्क काढू याबाबतचा हा संकेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल
सोशल मीडियावर बाळाचा हा फोटो सुपरहिट ठरला असून त्याला हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. नेटिझन्सनी देखील खास फोटोला चांगला प्रतिसाद दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असताना काही ठिकाणी कोरोनाचा वेग मंदावलेला देखील पाहायला मिळत आहे. तसेच अनेकांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.